Nashik Ring Road 
नाशिक

Nashik Ring Road | रिंगरोडप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर तोडग्याची आशा

Nashik Ring Road | गायकर यांचा दावा : प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिली माहिती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नाशिक रिंगरोडबाधित शेतकरी शिष्टमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री सकारात्मक तोडगा निघण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले.

मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती देण्यासाठी गुरुवारी (दि. ६) नाशिक येथे सर्व रिंगरोडबाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला राजू देसले, नानासाहेब बच्छाव, सुभाष गायकर, प्रवीण पाटील, वैभव दळवी, शिवम देशमुख, भारत पिंगळे, दीपक हगवणे, सुदर्शन पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्यात करण गायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. रिंगरोड प्रकल्पातील विविध गंभीर मुद्द्यांकडे आपण मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

तसेच मखमलाबाद ते गोवर्धनदरम्यान करण्यात आलेल्या कथित चुकीच्या अलाइनमेंटमुळे शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, विंचूरगवळी व वडनेर परिसरातील अलाइनमेंटमधील बदल, २०१३ चा भूसंपादन कायदा लागू असतानाही अनेक गावांमध्ये देण्यात आलेले कमी मोबदल्याचे दर, छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या नकाशामुळे माडसांगवी गावाला मिळालेला अल्पदर, तसेच महापालिका हद्दीतील गावांमध्ये अत्यंत कमी दराने जबरदस्तीने जमीन संपादन करण्याचे प्रयत्न याबाबतची सर्व कागदपत्रे व पुरावे मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केल्याचे गायकर म्हणाले.
राजू देसले आणि शेतकरी नेते नानासाहेब बच्छाव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, या बैठकीस नाशिक रिंगरोड बाधित १४ गावांतील शेतकरी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २९ अंतर्गत चिंचखेड ते दिंडोरी मार्गालगतच्या गावांतील शेतकरी उपस्थित होते.

दिशाभूल व पिळवणूक थांबवण्याची मागणी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २९ अंतर्गत चिंचखेड ते दिंडोरी मार्गालगतच्या गावांतील शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळावा, शासनाकडून झालेली दिशाभूल व पिळवणूक तत्काळ थांबवावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडल्याचेही गायकर यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT