नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उंटवाडी रोडवरील उषा किरण हौसिंग सोसायटी परिसरात निवृत्त सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याप्रकरणी आता पत्नीने चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मालमत्तेच्या वादातून वारंवार धमकावणे, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देणे तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडथळे निर्माण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या कौटुंबिक वादातून यापूर्वीही दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात अनेक वेळा अर्ज दिले होते. याप्रकरणी योगिता हेमंत हेमाडे (५२) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ८ ऑक्टोबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत यश हेमाडे, त्याची पत्नी भाग्यश्री, मुलगी प्रियांका खोपकर आणि मल्लिकार्जुन उंडी यांनी मालमत्तेच्या वादातून हेमंत हेमाडे यांना वारंवार धमकावले.
त्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आला. तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडथळे निर्माण करून त्यांच्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या छळाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री तीनच्या सुमारास हेमंत हेमाडे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. हेमाडे यांचा दुसरा विवाह झाला होता. पहिल्या पत्नीच्या मुलाचा या विवाहाला विरोध होता. त्यातून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले होते. मालमत्तेच्या तसेच आर्थिक कारणांवरून न्यायालयातही प्रकरणे सुरू होती.
या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड तपास करीत आहेत. पत्नीने केलेले आरोप, यापूर्वी दाखल झालेले अर्ज, मालमत्तेचा वाद आणि न्यायालयीन प्रकरणांची पार्श्वभूमी तपासली जात आहे. तपासानंतर आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि संबंधितांची भूमिका स्पष्ट होणार आहे.