नाशिक : ई-बस डेपोला वीजजोडणी रखडल्यामुळे आडगाव ट्रक टर्मिनस येथून ई-बस सेवेचा प्रारंभ आणखी सहा महिने लांबणीवर पडला आहे. चार्जिंग स्टेशनसाठी आवश्यक ओव्हरहेड वायर टाकण्यास चार ते पाच महिने लागणार असल्याने, नाशिककरांना ई-बस प्रवासासाठी २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नाशिक महापालिकेने ८ जुलै २०२१ पासून 'सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक' अंतर्गत शहर बससेवा सुरू केली. सध्या शहरात २०० सीएनजी व ५० डिझेल अशा एकूण २५० बस चालविल्या जात आहेत. पर्यावरणपूरक सेवेच्या दृष्टीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सिटीलिंक ताफ्यात ५० इलेक्ट्रिक बस समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, केंद्राच्या 'एन कॅप' योजनेअंतर्गत ५० इलेक्ट्रिक बसची खरेदी बारगळली होती. त्यानंतर सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'पीएम ई-बस' योजनेअंतर्गत महापालिकेला १०० ई-बस देण्याची घोषणा केली होती. त्यात पहिल्या टप्प्यात ५० बसेसना मंजुरी दिली आहे. त्यासाठी आडगाव येथील मनपाच्या ट्रक टर्मिनसमधील मोकळ्या भूखंडावर ई-बस डेपो साकारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, आतापर्यंत डेपोचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
बुधवारी (दि. १४) केंद्र सरकारच्या पीएम ई-बस विभागाकडून राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांचा आढावा घेण्यात आला. बस डेपो, वीजपुरवठा आणि बस पुरवठादारांशी करार याबाबत चर्चा झाली. वीज उपकेंद्र उभारण्यासाठी मनपा विद्युत विभागाने कार्यारंभ आदेश दिला असला, तरी पावसाळ्यात ही कामे शक्य नसल्याने चार महिन्यांनीच हे काम हाती घेतले जाणार आहे.
पीएम ई-बसच्या माध्यमातून महापालिकेला बस डेपोसाठी १० कोटी, वीज पुरवठ्यासाठी ५.७७ कोटी, उपकेंद्र उभारण्याकरिता २.६२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. वीज उपलब्ध झाल्यानंतर बस पुरवठादार कंपनीकडून दीड ते दोन महिन्यांत बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र वीज उपकेंद्र आणि ओव्हरहेड लाईनसाठीच पाच ते सहा महिने कालावधी लागणार आहे.
आडगाव येथील उपकेंद्रापासून ते बस डेपोपर्यंत ३३ केव्हीची ओव्हरहेड लाईन टाकण्यात येणार असून, यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देणे शिल्लक आहे. विजेची कामे होत नाहीत, तोपर्यंत पीएम ई-बस पुरवठादार असलेल्या जेबीएम इको लाईफ या कंपनीबरोबर मनपाला करारही करता येत नसल्याने महापालिकेच्या ई-बस सेवेचा प्रवास लांबणार आहे.