नाशिक / सिडको : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिन्यात पाथर्डी परिसरातील युवतीचा डेंग्यूने बळी गेल्याची घटना ताजी असताना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल अंबड लिंक रोडवरील अल्पवयीन युवकाचा डेंग्यूसदृश आजाराने बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तातडीने जिल्हा रुग्णालयाकडून अहवाल मागवला असून, डेथ ऑडिटनंतर मृत्यूचे निश्चित कारण जाहीर केले जाणार असल्याचे महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी सांगितले.
नाशिक शहरात ऐन सणासुदीच्या काळात डेंग्यू, स्वाइन फ्लूंसारख्या आजाराच्या साथींनी थैमान घातले आहे. पावसाने गेल्या महिनाभраपासून विश्राम घेतली असली तरी डेंग्यूचा प्रकोप मात्र कायम आहे. अंबड रहिवासी असलेला विनोद मडैया (१७) हा सध्या राहणारा अंबड-लिंक रोडवरील गणेश स्वीटच्या मागिल भागात राहत होता. विनोदला डेंग्यूचा ताप आला होता. उपचारासाठी आमच्या रुग्णालयात दाखल झाला होता.
उपचार सुरू असताना त्याच्या भावाने आम्हाला गावाला जायचे आहे, असे सांगत विनोदला दवाखान्यातून नेले, अशी माहिती डॉ. धनंजय पाटील, संचालक, उमा हॉस्पिटल यांनी दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या नोंदीनुसार विनोद लखीराम मडैया (१७) या आयटीआय अंबड लिंक रोड भागातील निवासी असलेल्या युवकाला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने कामटवाडे-अंबड लिंक रोड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
रुग्णाची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी सोमवारी रुग्णाच्या भावाने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. गुडे यांनी रुग्णाची तपासणी केली असता मयत घोषित केले. पोलिस नोंदीत मृत्यूचे कारण डेंग्यूचा ताप असल्याचे नमूद आहे.
दरम्यान, यासंदर्भातील माहिती मिळताच महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शासकीय रुग्णालयाकडून अहवाल मागवला असून डेथ ऑडिटनंतर रुग्णाचे मृत्यूचे कारण स्पष्ट केले जाणार असल्याचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शेटे यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात पाथर्डी परिसरातील एका युवतीचा डेंग्यूसदृश आजाराने बळी गेला होता.
या मृत्यूप्रकरणी डेथ ऑडिट केले जाणार होते. परंतु अहवाल अद्याप प्राप्त नाही. आता डेंग्यूने दुसरा बळी गेल्यानंतर पुन्हा डेथ ऑडिटची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्थात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव नाशिकमध्ये जीवघेणा ठरू लागल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
डेंग्यूची रुग्णसंख्या २०९ वर पोहोचली असून शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
जानेवारी ते जुलैदरम्यान डेंग्यूचे ५६ रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये आणखी ४५ रुग्णांची भर पडली, तर सप्टेंबरच्या चार आठवड्यात ८१ जणांना डेंग्यूची लागण झाली. ऑक्टोबरच्या गेल्या १३ दिवसांतच डेंग्यूचे तब्बल २७ नवे रुग्ण आढळल्याने डेंग्यू निर्मूलनाचा मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. विनोदच्या पश्चात वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. त्याचा मृतदेह मूळ गावी झारखंड येथे नेण्यात आला असून, तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
"विनोद राहत असलेल्या भागात मनपातर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे."— डॉ. विनोद पाउसकर, वैद्यकीय अधिकारी, सिडको