नाशिक : अधुनमधुन पावसाच्या हलक्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र संघाच्या चार दिवसांच्या रणजी सामन्याचा शनिवार (दि.१) चा पहिला दिवस पावसाच्या नावे राहिला. खेळपट्टी क्युरेटर्सनी दिवसभरात वेळोवेळी खेळपट्टीची पाहणी आणि हवामानाचा अंदाज घेतला. मात्र, पावसाचे सावट बघता सामना न खेळविण्याचा निर्णय घेतल्याने, दिवसभरात नाणेफेक सुद्धा होऊ शकली नाही. दरम्यान, सकाळी नियोजित वेळेनुसार मान्यवरांच्या उपस्थितीत सामन्याचे हवेत फुगे सोडून औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शनिवारपासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा रणजी स्पर्धेतील चार दिवसीय साखळी सामना खेळविला जात आहे. सामन्याचे आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बीसीसीआयचे सामनाधिकारी एस. डॅनियल मनोहर, पंच साईधर्शन कुमार व तन्मय श्रीवास्तव, खेळपट्टी तज्ज्ञ टी. मोहानन, महाराष्ट्र क्रिकेट संचालक शॉन विल्यम्स, दोन्ही संघाचे मुख्य प्रशिक्षण हर्षद खडीवाले, पृथ्वीपाल सिंग सोळंकी, कर्णधार अंकित बावणे, जयदेव उनाडकट यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करून घेतली. यावेळी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सकाळी ९ वाजता सामना सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, खराब हवामानामुळे दोन्ही पंचांनी सकाळी ११ वाजता खेळपट्टीचा अंदाज घेऊन सामना सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला. मात्र, खेळपट्टी खेळण्यालायक नसल्याने दुपारी १ वाजता सामना सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला गेला. ३ वाजेपर्यंत मैदानाची सखोल पाहणी केल्यानंतर शनिवारचा (दि.1) खेळ रद्द करण्याची घोषणा केली गेली. ढगाळ हवामान आणि दोन वेळी आलेल्या पावसाच्या हलक्या सरीमुळे मैदान खेळण्यायोग्य नसल्याचा निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला.
आजही पावसाचे सावट
पहिला दिवस पावसाच्या नावावर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार (दि.२) देखील सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. हवामान विभागाने यापूर्वीच नाशिकला दोन दिवसांचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे दुसरा दिवसही पावसाच्या नावावर जातो काय? अशी स्थिती आहे. दरम्यान, रविवारी सकाळी दोन्ही पंच मैदानाची पाहणी करून निर्णय जाहीर करणार आहेत.
चाहत्यांची मोठी गर्दी
आपल्या आवडत्या खेळाडूची झलक बघण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. खेळाडू जेव्हा मैदानावर येत होते, तेव्हा चाहते त्यांची छबी टीपत होते. तसेच जेव्हा खेळाडू हॉटेलवर परतले, तेव्हा देखील मैदानाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, सामना बघण्यासाठी जिल्हाभरातून तसेच इतर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी (दि.1) सकाळपासून सूर्यदर्शन झाल्यास सामना सुरू होऊ शकतो.
कर्मचाऱ्यांची मेहनत पाण्यात
रात्री आणि दिवसातून दोन वेळा पडलेल्या हलक्या सरींमुळे मैदान ओले झाले होते. मैदान खेळण्यायोग्य व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. मैदानावर कपडा टाकणे, तसेच ग्राऊंड ड्रायिंग मशिन व रोलिंग स्पंज फिरविण्याचे दिवसभर काम सुरू होते. मात्र, ढगाळ हवामान आणि पावसाच्या सरीमुळे कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले.