नाशिक : जिल्हाभरात गत 4 दिवसांपासून पावसाने थैमान घातल्यामुळे भाजीपाल्यावर संकट आले आहे. पावसामुळे गहू, ज्वारी, बाजरी, मकासह भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे येत्या 8 दिवसांत भाजीपाल्याचे दर अधिक कडाडण्याची चिन्हे आहेत.
सध्या भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत. कांदे बटाट्यासह टॉमेटो, कारले, गिलके, दोडके या भाज्यांनी शंभरी गाठली आहे. गत दोन ते तीन महिन्यांपासून वाढलेल्या दरांमुळे गृहिणी मेटाकुटीला आल्या आहेत. एकीकडे लाडक्या बहिणीला 1500 मिळाल्याचा आनंद अन दुसरीकडे महागाईचा सोस यामुळे गृहिणींचे किचनचे बजेट कोलमडले आहे. अशातच गत चार दिवसांपासून पाऊस दणका देत असल्याने पुढील आठवड्यात भाजीपाल्यांचे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे. महागाईच्या आगीत तेल ओतले जाणार आहे. दिवाळी तोंडावर असल्याने दिवाळीची खरेदी करणेही आवश्यक आहे.
यंदा पावसाळ्यात पाऊस चांगला झाल्यामुळे भाजीपाला स्वस्त होईल, असा अंदाज केला जात होता. मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने ऐन गणेशोत्सव अन नवरात्रोत्सवात भाजीपाल्याचे दर 20 टक्क्यांनी वाढले. वाढलेले दर कमी होण्याची आशा असतानाच आता पावसाने दणका दिला. त्यामुळे 100 ते 120 रुपयांनी विकला जाणारा भाजीपाला दीडशेच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
बटाटे - 70
कांदे - 70
टोमॅटो - 120
कारले - 140
वांगे - 150
गिलके - 180
दोडके - 150
कोबी - 40
फ्लॉवर - 40
मेथी - 60
कोथिंबीर - 40
लसूण - 550
आले - 250
घेवडा - 150
वाल - 130
कारले - 150