

नाशिक : जिल्ह्याला शनिवारी (दि. 19) परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला. चांदवड तालुक्यामध्ये दोन तासांत १०० मिलिमिटर पाऊस झाल्याने दाणादाण झाली. ढगफुटीसदृश पावसाने काठोकाठ भरलेले वडबारे शिवारातील दोन पाझर तलाव फुटून हाहाकार उडाला. भात, मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटो तसेच अन्य भाजीपाल्याचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने जिल्ह्यात ३८ हजार ५५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
परतीच्या पावसाने दाणादाण
चांदवड, देवळा तालुक्यांत ढगफुटीसदृश पाऊस
धुवाधार पावसाने दोन पाझर तलाव फुटले
भात, मका, कांद्यासह शेतपिकांचे नुकसान
नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. जिल्ह्याला शनिवारी पावसाने जोरदार तडाखा दिला. चांदवड व देवळा भागात ढगफुटीसदृश पर्जन्य झाले. तसेच नाशिक, मालेगाव, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यांतही त्याचा जोर चांगला होता. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसला. दोन तास मुसळधार चाललेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहिले. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. चांदवडमधील लेंडी नदीला पूर पाणी वाढल्याने ते आठवडे बाजारातील पांचाळ वस्तीतील झोपडपट्टीत शिरले. ३५ ते ४० कुटुंबांनी घरदार सोडून जीव वाचविला.