नाशिक : यंदा पाऊस पाठ सोडण्याचे नावच घेताना दिसून येत नाही. ७ मे पासून सुरू झालेला पाऊस अजूनही बरसतच आहे. प्रारंभी अवकाळी, त्यानंतर पावसाळा व पुन्हा अवकाळीचे ढग दाटून येत असल्याने, शेतकरी धास्तावले आहेत. शनिवारी (दि. २५) नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पाऊस बरसल्याने, शेत पिकांना फटका बसला आहे. हवामान विभागाने आणखी दोन दिवस ‘यलो अलर्ट’ दिल्याने, जिल्ह्यावर आता अवकाळीचे ढग अधिकच गदड झाले आहेत.
शनिवारी (दि.25) सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. धुवाधार झालेल्या या पावसाने शहरातील बहुतांशी भागांतील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. यंदा अतिवृष्टीमुळे अगोदरच बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील मालेगाव, येवला, नांदगाव, निफाड, सटाणा, चांदवड, सिन्नर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील तब्बल दोन लाख ८८ हजार ८०६ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. त्यात तब्बल दोन लाख ३४ हजार ११६ हेक्टरवरील जिरायती पिकांची नासाडी झाली तर बागायत ३३ हजार ५८७ व बहुवार्षिक फळपिकांचे ३२ हजार १०३ हेक्टर क्षेत्राची हानी झाली आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले असले तरी, अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. बळीराजा या संकटातून सावरत नाही, तोच पुन्हा अवकाळीचे संकट घोंगावत असल्याने बळीराजा धास्तावला आहे.
दरम्यान, शनिवारी शहरातील सातपूर, नाशिकरोड, सिडको, आडगाव, अमृतधाम, म्हसरूळ, मखमलाबाद आदी भागात पावसाने सखल भागात पाणी साचले होते. तसेच अन्य भागात तुरळक पाऊस झाला. याशिवाय जिल्ह्यातील मालेगाव, दिंडोरी, सिन्नर, येवला, चांदवड, नांदगाव, मनमाड याभागात पाऊस बरसला. दरम्यान, हवामान विभागाने २७ ऑक्टोबरपर्यंत यलो अलर्ट दिल्याने, जिल्ह्यावर पुढील दोन दिवस पावसाचे सावट असणार आहे.
वीजांच्या कडकडाटासह पाऊस
केरळ, तामिळूनाडूसह संपूर्ण दक्षिण भारतामध्ये पुढील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याल २७ आॅक्टोंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह हलका व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय ४० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसायट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
द्राक्ष, कांदा पिके संकटात
अतिवृष्टीमुळे द्राक्ष व कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आता पुन्हा अवकाळीचे संकट घोगावत असल्याने, पुन्हा एकदा द्राक्ष आणि कांदा पिके संकटात सापडली आहेत. याशिवाय खरीप पिकेही धोक्यात आली आहेत.