परतीच्या पावसाने धरणे पुन्हा काठोकाठ pudhari news network
नाशिक

Nashik Rain Update | परतीच्या पावसाने धरणे पुन्हा काठोकाठ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठाेकला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे बहुतांश धरण काठोकाठ भरली आहेत. जिल्ह्यातील उपयुक्त जलसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने गंगापूरसह तब्बल १२ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूरमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदाकाठ पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे.

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने दणक्यात पुनरागमन केले. राजस्थान व कच्छपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने अवघ्या राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. नाशिकमध्येही संततधार कायम आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. सद्यस्थितीत २४ प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ६४ हजार ३४० दलघफूवर पोहोचला आहे. गतवर्षी याच काळात हा साठा ८३.७१ टक्के म्हणजेच ५४ हजार ९६९ इतका होता.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जाेरदार सरींमुळे धरणात पाण्याची आवक वेगाने होत आहे. २४ पैकी ११ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर नाशिककरांना पाणीपुरवठा करणारे गंगापूरमध्ये ९९.१३ टक्के भरले असून, धरणात ५,५८१ दलघफू जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे धरणातून सकाळपासून विसर्ग सुरू करण्यात आला असून, सध्या १,१६९ क्यूसेक वेगाने विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदाघाटावरील छोटे-मोठे सांडवे व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. इगतपुरीत ही पावसाचा जोर कायम असल्याने दारणाचा विसर्ग ३६१२ क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. याव्यतिरिक्त अन्य धरणांचा विसर्ग कायम आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणांच्या विसर्गात वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागासाक्या ३५ टक्के

दीड वर्षभरापासून कोरडेठाक असलेल्या नागासाक्याला परतीच्या पावसाने नवसंजीवनी मिळाली आहे. धरणात १४१ दलघफू (३५.५३ टक्के) जलसाठा निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गंगापूर व दारणाव्यतिरिक्त भाममधून ५६० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. कडवामधून ६,६४०, वालदेवी व आळंदी प्रत्येकी ३०, भावली १३५, वाघाड १७८, वाकी ४६४, काश्यपी ६४० व करंजवणमधून ३०१ क्यूसेक विसर्ग केला जात आहे. तर नांदूरध्यमेश्वर बंधाऱ्यातून ८,९३८ क्यूसेक वेगाने जायकवाडीकडे पाण्याचा प्रवाह सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT