नाशिक : शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार सुरू असून, २९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झालीद्या, नाले दुथडी भरून वाहात असल्याने धरणांची पाणीपातळी वाढली आहे. जिल्ह्यातील १३ धरणांमधून सातत्याने विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गात ५३० क्यूसेकने वाढ करून, तो ५,१८६ क्यूसेकवर पोहोचल्याने गोदावरीला हंगामातील पहिला मोठा पूर आला. होळकर पुलाखालून १०,१५४ क्यूसेक वेगाने पाणी प्रवाही होत असल्याने, पुराचे मानक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत प्रथमच पाणी लागले.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, सुरगाणा, कळवण आदी तालुक्यांत पावसाची झड लागली आहे. सध्या दारणा धरणातून ११,४५६ क्यूसेक, गंगापूरमधून ५,१८६, नांदूरमध्यमेश्वर ३९,१७२, पालखेड २,०३४, पुणेगाव २५०, भोजापूर ७६, भावली १,२१८, भाम ५,२८३, वाकी १,०४१, वालदेवी ६५, आळंदी २४३, काश्यपी ५००, मुकणे धरणातून ४०० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातील जलसाठा ६० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आला असून, भाम, भावली, वालदेवी, भोजापूर, केळझर, हरणबारी ही धरणे तुडुंब भरून ओसंडली आहेत.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील २४ तासांत ५५ मिमी, तर १ जुलैपासून ५४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उद्या वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
धरण - टक्केवारी
दारणा - ६१.८८
मुकणे - ७०.९५
वाकी - ८४.२७
भाम - १००
भावली - १००
वालदेवी - १००
गंगापूर - ५९.४८
काश्यपी - ८१.७०
गौतमी गोदावरी - ६६.३८
कडवा - ६०.५५
आळंदी - ९४.८५
भोजापूर - १००.००
पालखेड - ५२.३७
करंजवण - ५१.००
ओझरखेड - ४४.२७
वाघाड - ७१.०७
तिसगाव - २५.४९
पुणेगाव - ७५.३२
नांदूरमध्यमेश्वर - ८१.७१
चणकापूर - ४६.७२
हरणबारी - १००
केळझर - १००
नाग्यासाक्या - १८.६४जायकवाडी
गंगापूर धरणातून आतापर्यंत ४२ हजार क्यूसेक वेगाने ३,६३० दलघफू, दारणा धरणातून ६२,५१५ क्यूसेक वेगाने ५,४०३ दलघफू, तर कडवा धरणातून ६,४५९ क्यूसेक वेगाने ५५८ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे. यासह इतर नद्यांचे मिळून नांदूरमध्यमेश्वर बंधार्यातून आतापर्यंत १७,९७३ दलघफू पाणी म्हणजे जवळपास १८ टीएमसी पाणी 'जायकवाडी'ला रवाना झाले आहे. ही सकाळ सत्रातील आकडेवारी असून, सायंकाळपर्यंत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार (दि. १०) पर्यंत नंदुरबार तसेच मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भातील १९ जिल्ह्यांत आणि जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर अशा सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटावर उगम पावणार्या महाराष्ट्रातील गोदावरी, दारणा, गिरणा, वैतरणा, कश्यपी, कडवा, प्रवरा, भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, कृष्णा- कोयना, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, भोगावती या नद्या दुथडी वाहू शकतात. संपूर्ण मराठवाड्यातील आठ तसेच जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यांतील मोसमी प्रदेशातील उर्वरित तालुक्यात उद्यापर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे.