नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यावर ढगफुटीसदृश पावसाचे संकट निर्माण झाल्याने, यंत्रणा 'हाय अलर्ट मोड'वर आली होती. मात्र, सुदैवाने हे संकट उत्तरेकडे सुरत आणि दक्षिणेकडे अकोले, अहिल्यानगरकडे सरकल्याने यंत्रणांच्या जीवात जीव आला. नाशिकवरील संकट टळल्याची चर्चा होत असतानाच, रस्त्यांनी मात्र नाशिककरांना छळल्याचा संतापही व्यक्त होत होता.
संततधार पावसाने कुठे रस्त्यांवर भगदाड, तर कुठे खोदकामामुळे वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. शहरभर जागोजागी पाण्याचे डबके साचल्याने, रस्तेच दिसेनासे झाले होते. त्यामुळे या जाचातून नेमकी केव्हा सूटका होणार, असा सवाल नाशिककरांकडून व्यक्त केला गेला. सोमवारी (दि. ६) रात्रभर आणि मंगळवारी (दि. ७) दिवसभर संततधार पावसाने हजेरी लावली. दिवसभरात २३.७ मिमी पावसाची नोंद झाली.
संततधार पावसाने मात्र शहराची पुरती दैना केली. शहरातील जवळपास सर्वच रस्ते चिखल आणि खङ्ख्यांमध्ये हरविल्याचे चित्र दिसून आले. आगामी सिंहस्थ, कुंभमेळ्यानिमित्त विकासकामांसाठी केलेल्या खोदकामाचा राडारोडा रस्त्यावर आल्याने, जीव मुठीत घेऊन नाशिककरांना त्यातून मार्ग काढावा लागत आहे.
दरम्यान, संततधार पावसामुळे खोदकाम केलेले खड्डे तुडुंब भरल्याने, ते धोकादायक स्थितीत आहेत. याशिवाय सखल भागात पाणी साचल्याने, नागरिकांची मोठी गैरसोय असल्याचे दिसून आले. सातपूरमधील शिवाजीनगरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचे समोर आले.
याशिवाय, सिडको, गंगापूर गाव, पाथर्डी फाटा परिसर, आडगाव, मखमलाबाद नाका, म्हसरूळ या परिसरात देखील अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, विकासकामांचे निमित्त पुढे करून केलेल्या बेसुमार खोदकामामुळेच नाशिक शहराची ही अवस्था झाल्याची भावना नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.
खोदकामामुळे वृक्ष कोसळला
शहरभर केलेले बेसुमार खोदकाम आता वृक्षांच्या जीवावर बेतत आहे. खोदकाम करताना बऱ्याच वृक्षांची मुळे तोडण्यात आल्याने, ती कोसळत आहेत. घारपुरे घाट येथील मोठे लिंबाचे झाड याचमुळे पडल्याची चर्चा आहे. याशिवाय, मॅरेथॉन चौकातही लिंबाचे झाड पडल्याने, वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. ही दोन्ही झाडे रस्त्याच्या मधोमध कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवित वा आर्थिक हानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत झाडे हटविण्याचे काम सुरू होते.
रस्त्यावर एक फुटापर्यंत पाणी
शहरातील बहुतांश भागांत रस्त्याच्या मधोमध पाणी साचल्याने, त्यातून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाइपलाइन रोड परिसरात असलेल्या डी-मार्टसमोरील रस्त्यावर तब्बल एक फुटापर्यंत पाणी साचल्याने, त्यातून वाहने काढणे अवघड होत आहे. याशिवाय द्वारका परिसरातदेखील रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्र्यंबक रोड, मखमलाबाद परिसरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आल्याचे दिसून आले.
निसरड्या रस्त्यावरून अपघात
रस्त्याच्या कडेलाच टाकण्यात आलेला राडारोडा रस्त्यावर आल्याने, शहरभरातील विशेषतः उपनगरांमधील रस्ते निसरडे बनले आहेत. त्यामुळे त्यावरून अपघाताचे अनेक प्रकार समोर आले आहेत. विशेषतः दुचाकीचालकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले. वाहनांचे ब्रेक लावल्यानंतरही वाहने सरपटत जाऊन समोरच्या वाहनांवर आदळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
रस्त्याला पडले भगदाड गंगापूर रोडसह पाइपलाइन भागातील रस्त्यांना मोठमोठे भगदाड पडल्याचे दिसून आले. यंत्रणांकडून या रस्त्यांची कुठल्याही प्रकारची डागडुजी केली नसल्याने, ते धोकादायक स्थितीत आहेत. सुमारे दोन फुटांपेक्षा अधिक खोलीचे हे भगदाड असून, त्यात अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी ही बाब महापालिका प्रशासनाच्या निदर् नास आणून दिली. मात्र, उशिरापर्यंत त्याची डागडुजी केली गेली नाही.
रस्त्याला पडले भगदाड
गंगापूर रोडसह पाइपलाइन भागातील रस्त्यांना मोठमोठे भगदाड पडल्याचे दिसून आले. यंत्रणांकडून या रस्त्यांची कुठल्याही प्रकारची डागडुजी केली नसल्याने, ते धोकादायक स्थितीत आहेत. सुमारे दोन फुटांपेक्षा अधिक खोलीचे हे भगदाड असून, त्यात अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी ही बाब महापालिका प्रशासनाच्या निदर् नास आणून दिली. मात्र, उशिरापर्यंत त्याची डागडुजी केली गेली नाही.