नाशिक : गत तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु असल्याने जिल्ह्यातील 7 धरणे ओव्हरफ्लो झाली असून 16 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून रविवारी (दि.6) दुपारी 2 वाजेपर्यंत 5186 क्युसेकने विसर्ग सुरु होता. त्यात 1150 ने वाढ करुन विसर्ग 6336 क्युसेक करण्यात आल्याने गोदावरीच्या पुरात वाढ झाली आहे. परिणामी रामसेतू पुलाला पाणी लागले आहे. हवामान विभागाने मंगळवारी यलो अलर्ट जारी केला आहे.
पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 71 टक्के जलसाठा तयार झाला आहे. मागीलवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ 11.62 टक्के जलसाठा होता. गत 24 तासांत नाशिकमध्ये 12.6 मिमी तर जिल्ह्यात 55 मिमी आणि गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात 36 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दारणा 13160
गंगापूर 6336
नांदुरमध्यमेश्वर 43882
पालखेड 646
पुणेगाव 250
भोजापूर 990
भावली 948
भाम 3252
वाकी 363
वालदेवी 1305
आळंदी 687
काश्यपी 1000
मुकणे 400
कडवा 3620
करंजवण 210
जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, कडवा, मुकणे, भोजापूर, आळंदी आणि वालदेवी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने हे सर्व पाणी नांदुरमध्यमेश्वर धरणात पोहोचते परिणामी, नांदुरमध्यमेश्वर धरणातून 20 हजार 822 अर्थात 20 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. जोरदार पावसामुळे वालदेवी धरणातून 1305, पालखेड 464 तर करंजवण धरणातून 315 क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. मंगळवारी यलो अलर्ट असल्याने ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गोदेच्या पुरात वाढ झाल्याने गोदाकाठावरील गंगा गोदावरी मंदिर, बाणेश्वर महादेव मंदिर, कपूरश्वर महादेव मंदिर स्वयंभू, भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर, अर्धनारीनटेश्वर, सिद्ध पाताळेश्वर, श्री मार्तंड भैरव मंदिर, श्री परमहंस नरसिंग गोपालदास महाराज संजीवन समाधी मंदिर, छोटी मोठी हनुमानाची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गांधी तलाव देखील पाण्यात बुडाला आहे. गोदाकाठावरील धार्मिक विधी बंद पडले आहेत.