नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यांत गुरुवारी पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यात पावसाचा जोर वाढल्याने देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या गणेशभक्तांची तारांबळ उडाली. सायंकाळी 6 नंतर नागरिक सहकुटुंब देखावे बघण्यासाठी बाहेर पडतात. मात्र, पावसाने लहान मुले, महिला आणि वृद्धांची तारांबळ उडली.
हवामान विभागाने गुरुवारी (दि. 4) ऑरेंज अलर्ट दिल्याप्रमाणे दिवसभर मध्यम पावसाची रिपरिप सुरूच होती. शुक्रवारी (दि.5) यलो अलर्ट असल्याने पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी शहरातील पंचवटी, अंबड, सिडको, गंगापूर रोड परिसरात बुधवारी (दि. 3) रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. रस्त्यांवर साचलेले पाणी आणि पावसामुळे पडलेले मोठे खड्डे यामुळे वाहनांना मार्ग काढण्यात अडचणी येत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी बघावयास मिळाली. इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, रविवार कारंजा, सीबीएस, अशोकस्तंभ याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सुरू होती. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने पोलिस प्रशासनाने मुख्य रस्त्यांवर होमगार्डस् तैनात केले आहेत. मात्र, वाहनांची संख्या जास्त असल्याने कोंडी होत आहे.
जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणांत सध्या 97.23 टक्के पाणीसाठा असल्याने धरण काठोकाठ भरल्याने गत 3 दिवसांपासून 1136 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. गंगापूरसह दारणा व इतर 12 धरणांतून अद्यापही विसर्ग कायम आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, धरणांतून पाणी सोडावे लागू शकते, असे आवाहन सिंचन विभागाने केले आहे.
पावसामुळे ग्रामीण भागात सोयाबीन, मका, भाजीपाला आदी पिकांना दिलासा मिळत आहे. मात्र, जास्त पावसाने काही भागांत पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 1077 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोदावरीला हंगामात 20 जूनला पहिला पूर आला होता. त्यानंतर गंगापूर धरणातून विसर्ग कायम राहिल्याने गोदावरीला आता सातव्यांदा पूर आला आहे. पूरस्थिती असल्याने गोदकाठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी जाण्याचा सल्ला पाटबंधारे खात्याने दिला आहे. पुढील 24 तास मध्यम व जोरदार पावसाची शक्यता असल्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.