Nashik Rahad Culture 
नाशिक

Nashik Rahad Culture| फक्त नाशिकमध्येच जपली जाते 'रहाड' संस्कृती! पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा आजही जिवंत

Nashik Rahad Culture | पेशवेकालीन परंपरेनुसार रहाडी खोदण्यास प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकला सांस्कृतिक आणि धार्मिकतेचा वारसा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. येथे रंगपंचमीचा उत्सव हा पारंपरिक 'रहाड संस्कृती' म्हणून साजरा केला जातो. रंगाने भरलेल्या मोठ्या हौदात उडी मारून रंगोत्सव साजरा केला जातो.

नाशिकमध्ये पेशवेकालीन परंपरेपासून चालत आलेली 'रहाड संस्कृती' अजूनही नाशिककर पाळत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही धूलिवंदनाच्या दिवशी या रहाडी खोदण्यास प्रारंभ झाला असून, दोन दिवसांत तयारी पूर्ण होईल, असे आयोजकांनी सांगितले आहे.

नाशिक शहरात रंगपंचमीचा उत्सव पेशवेकालीन परंपरेनुसार रंगाने भरलेल्या रहाडीत 'धप्पा' देत अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. शहरातील विविध भागातील रहाडी पेशव्यांच्या काळात खोदलेल्या असून, आजही त्या परंपरेची साक्ष देतात. या रहाडींमध्ये ठरलेल्या रंगानुसार रंगांचे पूजन करून ते रहाडीत टाकल्यानंतर विधिवत यज्ञपूजन केले जाते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने रंगोत्सवाला सुरुवात होते.

रंगपंचमीच्या दिवशी पूजनानंतर तरुणाईसह लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण रंगाने भरलेल्या रहाडींत सूर मारतात. या खास पद्धतीला 'धप्पा' मारणे असे म्हणतात. रहाडींची साफसफाई वेगाने सुरू असून, अद्याप जुनी तांबट लेन, मधली होळी आणि शनी चौक येथील रहाड खोदकाम सुरू आहे.

इतिहास काय सांगतो...

पूर्वीच्या काळी पहिलवानांची शक्तिप्रदर्शनाची जागा म्हणजे 'रहाड' मानली जात होती. रहाडीमध्ये म्हणजे मोठे हौद यामध्ये पूर्वी कुस्तीचे सामने रंगायचे. कुस्तीच्या आयोजनामुळे या ठिकाणी हाणामाऱ्या होत असल्याने 'राडा झाला' हा शब्द प्रयोग प्रचलित झाला असावा आणि त्यावरून 'रहाड' हा शब्द नाशिककरांच्या मनावर कोरला गेला आहे.

अशी आहे रहाड...

२५ बाय २५ फुटांचा चौरस आणि १० ते १२ फूट खोल पाणी भरलेल्या हौदात रहाडीचा ठरलेला एक ठरावीक रंग भरून त्यामध्ये उडी मारली जाते. पाण्यामध्ये उडी मारण्यापूर्वी प्रत्येक रहाडीची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी दुपारनंतर या रहाडीची पारंपरिक रंगांनी पूजा केली जाते. नाशिकमध्ये पेशवेकालीन एकूण १७ रहाडी आहेत. त्यापैकी सध्या शनी चौक, जुने नाशिकमधील तिवंधा चौक, जुनी तांबट लेन, मधली होळी, दंडे हनुमान, कथडा शिवाजी चौक परिसर आणि गोदाकाठावरील दिल्ली दरवाजा येथे रहाड संस्कृती पाळली जात आहे.

मुठे गल्लीतील शनि चौक मित्रमंडळ येथील पेशवेकालीन ही रहाड असून, गुरुवारी (दि.५) भूमिपूजन करून खोदकाम करण्यात येईल. या रहाडीसाठी केशरी रंग असेल. रंगपंचमीच्या दिवशी पुन्हा रहाडीचे विधिवत पूजन झाल्यानंतर धप्पा मारण्याचा आनंद अनुभवता येणार आहे.
- अ.वि. महाराज दीक्षित, रहाडीचे मानकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT