नाशिक : नाशिकमध्ये ८० पेक्षा अधिक विकासकांचे पाचशेहून अधिक पर्याय एकाच छताखाली बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली. १४ ते १८ ऑगस्टदरम्यान सिटी सेंटर मॉल जवळील ठक्कर डोम येथे 'क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो २०२५' चे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गौरव ठक्कर म्हणाले, 'नाशिकमध्ये स्वत:चे घर असावे, असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. या एक्स्पोच्या निमित्ताने एकाच छताखाली असंख्य पर्याय उपलब्ध होणार आहेत. प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते म्हणाले, आगामी काळात लोकलद्वारे नाशिक-मुंबई जोडले जाणार आहे. डिफेन्स हब म्हणून नाशिकला संधी आहे. प्रस्तावित आयटी हबला चालना देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दिंडोरीतील अक्राळे येथे रिलायन्स लाइफ सायन्सेससारखा मोठा उद्योग आला आहे. मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे संधी निर्माण झाली आहे. ३६ हजार स्क्वेअर मीटरवर इंडियन आईलचा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प साकारण्यात आला आहे. वाइन, कृषी, ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या संधी नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे. आगामी सिंहस्थासाठी शासनाकडून पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.
समन्वयक नरेंद्र कुलकर्णी म्हणाले, नाशिकमध्ये प्रस्तावित दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे. पुणे हायस्पीड रेल्वे, समृद्धी महामार्ग, चेन्नई-सुरत एक्स्प्रेस वे, वाढवण बंदर रस्ता आदी प्रस्तावित असून, लवकरच हा सर्व प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता असल्याने नाशिकमध्ये गुंतवणूकीचा पर्याय सर्वोत्तम ठरणार आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष अनिल आहेर, अंजन भालोदिया, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, समिती सदस्य श्यामकुमार साबळे, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड आदी प्रयत्नशील आहेत.
प्रॉपर्टी एक्स्पोच्या प्रदर्शन स्थळासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला असून, विविध स्टॉल विकसकांना निर्धारित करण्यात आल्याची माहिती मानद सचिव तुषार संकलेचा यांनी दिली. रिअल इस्टेट क्षेत्रामुळे शहराच्या तसेच देशाच्या अर्थकारणास नेहमीच सकारात्मक दिशा मिळत असून, नाशिकमधील या प्रॉपर्टी एक्सपोमुळे देखील अर्थकारण सकारात्मक दिशेने वाटचाल करेल असा विश्वास उपाध्यक्ष उदय घुगे व एक्सपो कमिटीचे मनोज खिवंसरा यांनी व्यक्त केला.