नाशिक : मित्र व सावकार यांच्या जाचाला कंटाळून शासकीय ठेकेदार सुदर्शन सांगळे यांनी जीवनयात्रा संपविल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या नाशिक आयुक्तालयांतर्गत पोलिस यंत्रणेकडून सावकारांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. मात्र, सावकारांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आणखी किती नागरिकांना जीव द्यावा लागणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
सुदर्शन सांगळे जीवनयात्रा संपविणे प्रकरणात नवनाथ परसराम टिळे (रा. एकलहरा कॉलनी) आणि राम किसनराव शिंदे (रा. हिवरखेड, ता. चांदवड) या दोघांविरोधात कारवाईची मागणी होत आहे. संबंधित सावकारांचा शोध घेऊन सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळे आणि शिंदे या दोघांनी सुदर्शन सांगळे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील जमिनीच्या व्यवहारात मोठी आर्थिक फसवणूक केली होती. फसवणुकीनंतरही त्यांनी सांगळे यांच्याकडून आणखी रोख रक्कम घेण्यास भाग पाडले. त्यानंतर पैशांसाठी सतत तगादा लावण्यात आला. या सर्व प्रकारामुळे सांगळे मानसिकदृष्ट्या खचले आणि अखेर त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
सांगळे यांच्या पँटच्या खिशात त्यांच्या भाचा निखिल शंकर आव्हाड यांना एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मित्र असलेल्या नवनाथ टिळे आणि राम शिंदे या दोघांची नावे नमूद केली होती. तसेच त्यांच्याकडून झालेल्या आर्थिक फसवणुकीचा उल्लेखही केला होता. या आधारावर सांगळेंच्या नातेवाइकांनी ओंकार ऊर्फ सचिन कारभारी सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून, पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण या घटनेचा तपास करत आहेत.
ठेकेदार सांगळे यांनी टिळे आणि शिंदे यांच्या सांगण्यावरून काही आर्थिक व्यवहारात गुंतवणूक केली होती. अधिक पैसे लागल्याने त्यांनी ओळखीच्या लोकांकडून हातउसनी रक्कम घेतली होती. तसेच, टिळे आणि शिंदे यांनी सांगळे यांच्या नावाने काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. ज्याचे व्याज सांगळे वेळोवेळी भरत होते, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या व्यवहारात सहभागी असलेले सावकार कोण आहेत, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
शासकीय ठेकेदार सुदर्शन सांगळे यांच्या आत्महत्येच्या चिठ्ठीआधारे तपास सुरू असून, त्या चिठ्ठीत उल्लेख असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. पुढील चौकशी सुरू आहे.सुनील पवार, पोलिस निरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे
सावकारांकडून लूट सुरूच
सध्या पोलिस आयुक्त व यंत्रणेकडून गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत सावकारीच्या माध्यमातून आर्थिक लूट करणाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरोपी टिळे, शिंदे तसेच संबंधित सावकारांना ताब्यात घेऊन कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.