नाशिक : महाराष्ट्रातील आरोग्य सेवा पुढील तीन वर्षांत सुधारण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची क्षमता अपुरी असल्याने मोठ्या रुग्णालयांवर ताण येतो आहे. त्यामुळे प्राथमिक व दुय्यम आरोग्य संस्था सुधारून 'हब अॅण्ड स्पोक'च्या माध्यमातून कार्यक्षम सेवा दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’ (सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अॅण्ड रिसर्च ऑटोनॉमी) प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. १) झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दूरदृष्यप्रणालीव्दारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सुविधा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. राज्यातील १३ कोटी जनतेच्या आरोग्याची काळजी सरकार घेत आहे. तरी सध्या ५० टक्के आरोग्य सेवा बाहेरून घ्याव्या लागतात, त्यामुळे खर्च वाढतो. या सेवा सरकारी रुग्णालयांतच उपलब्ध करून देत बचतीचे नियोजन करण्यावर भर दिला. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुकास्तरीय उपकेंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांनी सक्रिय भूमिका निभावावी, जेणेकरून जिल्हास्तरीय संस्था संशोधनाकडे लक्ष केंद्रित करू शकतील, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विद्यापीठाच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन केले.
उपमुख्यमंत्र्यांनी ‘चक्र’ मॉडेल आणि ‘हब अँड स्पोक’ पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, मागील काळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नागपूर आयआयएमसोबत आदिवासी आरोग्य क्षेत्रात प्रभावी काम केले आहे. नव्या उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध होतील. विद्यापीठांनी संशोधनाला चालना देत उत्कृष्टता केंद्र, ईन्क्यूबेशन, स्टार्टअप आणि मार्गदर्शन केंद्र म्हणून काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठे केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता संशोधन, नवाचार आणि स्टार्टअपची केंद्रे बनली पाहिजेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि ‘चक्र’ उपक्रम सामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरतील आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्य विद्यापीठाला ‘डिजिटल कुंभ’सोबतच ‘आरोग्यदायी कुंभ’ संकल्पना राबवण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यापीठाच्या ‘चक्र’ उपक्रमांतर्गत उभारलेल्या विविध केंद्रे, विभाग, क्लिनिकल ट्रायल सेंटर व ‘इक्षणा’ म्युझियमच्या डिजिटल स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. राज्य शासनाकडून विद्यापीठाच्या प्रत्येक उपक्रमाला पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.