नाशिक : महापालिका निवडणुका आता अवघ्या १८ दिवसांवर असताना राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रमात चौथ्यांदा बदल केला आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ डिसेंबरला प्रसिध्द केल्या जाणार होत्या. परंतु आता त्या ३ जानेवारीपर्यंत प्रसिध्द केल्या जाणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिका निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यापूर्वी मतदार याद्यांच्या कार्यक्रमात दोन वेळा दुरूस्ती करत सुधारीत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला होता. प्रारूप मतदार याद्यांवर नाशिकमध्ये ९७१७ हरकती प्राप्त झाल्या.
नाशिकप्रमाणेच राज्यभरातील महापालिकांच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याने सर्वच महापालिकांमध्ये मतदार याद्यांवर विक्रमी हरकती प्राप्त झाल्याने या हरकतींवर सुनावणी घेऊन १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्दीचे निर्देश आयोगाने दिले होते. परंतु, या हरकतींच्या पडताळणीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने अंतिम मतदार याद्या प्रसिध्दीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकांकडून राज्य निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तिसऱ्यांदा मतदार याद्यांचा सुधारीत कार्यक्रम जारी करत प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांसाठी पाच दिवसांची मुदतवाढ देताना मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ डिसेंबरला प्रसिध्द करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार १५ डिसेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्या गेल्या. शनिवारी(दि.२७) अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार होत्या. परंतु आयोगाने पुन्हा मतदार याद्यांच्या कार्यक्रमात सुधारणा केली आहे.
असा आहे बदल
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारीत कार्यक्रमानुसार दुबार मतदार व मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचे कंट्रोल चार्ट कोणत्याही परिस्थितीत २७ डिसेंबरला अपलोड करण्यात आले. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी मात्र ३ जानेवारीला प्रसिध्द करण्यात येणार आहे. महापालिकानिहाय संपूर्ण मतदार यादी जसजशी पूर्ण होईल. तसतशी ३ जानेवारीपर्यंत प्रसिध्द करण्यात यावी, असे आयोगाने सूचित केले आहे.