नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतील जागावाटपावरून एकीकडे महायुतीत खलबतं सुरू असताना शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती निश्चित झाली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील आणि उबाठाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सुर्यवंशी यांनी सोमवारी (दि. २२) बैठक घेत, जागावाटपाबाबत चर्चा केली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी छोट्या पक्षांसोबत चर्चा सुरू केली आहे. मंगळवारी (दि.२३) मनसे, शिवसेनेकडून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेससोबत चर्चा केली जाणार आहे.
नाशिक महापालिका निवडणूकीसाठी मंगळवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडीच्या चर्चांना वेग आला आहे. भाजपकडे सर्वाधिक ७९ माजी नगरसेवक असताना शिवसेना शिंदे गटाने ४५ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने ३० जागांची मागणी केल्याने महायुतीतील जागावाटवाचा फैसला होऊ शकलेला नाही. दुसरीकडे मनसे आणि शिवसेना(उबाठा)तील आघाडीची चर्चा फलदायी ठरत आहे.
सोमवारी (२२) डी.जी.सुर्यवंशी आणि दिनकर पाटील यांच्यात शहरातील ३१ प्रभागातील १२२ जागांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक प्रभागात उमेदवार कोणते, कोणत्या पक्षाची ताकद आहे, कोणाला उमेदवारी देण्यात यावी, महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे येथे प्राबल्य आहे का? यावर दिवसभर खल करण्यात आला. दोन्ही पक्षांच्या जागावाटपावर चर्चा झाल्यानंतर मित्र पक्षांना कोणत्या जागा सोडायच्यात यावर देखील खल करण्यात आला. त्यानंतर वंचित, माकप, भाकप तसेच रासप या घटकपक्षांच्या स्थानिक नेतृत्वासोबत जागावाटपावर सायंकाळ पासून चर्चा सुरू करण्यात आल्या आहेत. मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू केली जाणार आहे.