नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावास दोन वर्षे कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावण्यात आली आहे. यामुळे मंत्री कोकाटेंचे मंत्रिपदासह आमदारकी धोक्यात सापडली आहे. मंत्रिपद धोक्यात आल्याने मंत्री कोकाटे हे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेतूनही बाहेर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाने दावा केला होता. यात पालकमंत्रिपदासाठी कोकाटे हे प्रमुख दावेदार होते. मात्र, या कारवाईने त्यांचा पालकमंत्रिपदाचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कोकाटेंचे नाव मागे पडल्याने आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन व शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यात पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
सुरुवातीला जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी मंत्री महाजन यांची घोषणा झाली. मात्र, त्यास शिवसेना व राष्ट्रवादीकडून विरोध झाल्याने मंत्री महाजन यांच्या पालकमंत्रिपदास 24 तासांत स्थगिती देण्यात आली. यास महिला उलटूनही पालकमंत्रिपदाचा तिढा सुटू शकलेला नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक सात आमदार असल्याने, पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीचा दावा असल्याचे खुद्द मंत्री कोकाटे यांनी सांगितले होते. शिवसेनेनेही पालकमंत्रिपदाबाबत हट्ट केला आहे. वारंवार पक्षाने पालकमंत्रिपदाबाबत आग्रही भूमिका मांडली आहे. तर, भाजपही कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदासाठी आग्रही झालेली आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला आहे. त्यावर वरिष्ठ पातळीवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. गत आठड्यात जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की, अजित पवार या दोघांनाही पालकमंत्रिपदाबाबत लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगत मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असे सांगितले. त्यामुळे या आठवड्यात पालकमंत्रिपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. असे असतानाच, मंत्री कोकाटे यांना दोन वर्षांच्या शिक्षेचा निर्णय नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून आला. या निर्णयामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचा परिणाम मंत्रिपदासह आमदारकीवर होऊ शकतो. तसेच तो पालकमंत्रिपदावर होण्याची शक्यता आहे. त्यांना राजीनामा देण्याची नामुष्की ओढवल्यास आपोपच त्यांचा पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेतून ते बाद होतील. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तरी, पालकमंत्रिपद देताना त्यांची अडचण होण्याची शक्यता अधिक आहे.
मंत्री कोकाटे त्यांना पालकमंत्रिपद मिळू नये, यासाठी कोकाटे विरोधक देव पाण्यात बुडवून बसले होते. पक्षासह महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिवसेनेने त्यांच्या पालकमंत्रिपदास विरोध दर्शविला होता. याबाबत मात्र, उघड भूमिका घेतली जात नव्हती. आता मंत्री कोकाटेंवर कारवाई झाल्याने हा विरोधकांचा डाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.