पंचवटी: भारतीय जनता पक्षात प्रवेशावेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले, गुरुमित बग्गा, नरेश पाटील, नीलम पाटील, खंडू बोडके, नंदिनी बोडके, गौरव गोवर्धने व सहकारी  (छाया : गणेश बोडके)
नाशिक

Nashik Politics : पंचवटीत काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेला खिंडार

माजी नगरसेवक गुरुमित बग्गा, नंदिनी बोडके यांचा भाजपत प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी (नाशिक) : भाजपने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये १०० प्लसचा नारा दिल्यानंतर विविध पक्षाच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये जोरदार इन्कामिंग सुरु आहे. प्रभाग क्रमांक पाचमधील काँग्रेसचे माजी नगरसेवक व उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी नगरसेविका कै. विमल पाटील यांचे चिरंजीव नरेश पाटील व सूनबाई नीलम पाटील, मनसेच्या माजी नगरसेविका नंदिनी बोडके व खंडू बोडके तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गौरव गोवर्धने यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेला खिंडार पडली असून आगामी काळात आणखी कोणाची आणि किती इन्कामिंग होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली असून पंचवटी विभागातील प्रभाग संख्या जैसे थे असून, मागील पंचवार्षिक २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचना ठेवण्यात आली आहे. पंचवटीत एकूण सहा प्रभाग आणि २४ नगरसेवक संख्या असणार आहे. दोन दिवसांपूर्वी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर त्याअनुषंगाने इन्कमिंग सुरू झाले आहे. यात महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला भाजपने खिंडार लावली असून राष्ट्रवादी युवकचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गौरव गोवर्धने यांना गळाला लावल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. ते प्रभाग क्रमांक तीनमधून नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधुन काँगेसचे ज्येष्ठ नेते गुरुमित बग्गा, माजी नगरसेविका विमल पाटील या अपक्ष म्हणून तर माजी नगरसेविका नंदिनी बोडके या मनसेच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. तर प्रभाग तीनमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून गौरव गोवर्धने यांनी निवडणूक लढली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर गुरुमित बग्गा, काँग्रेसचे तथा माजी नगरसेविका कै. विमल पाटील यांच्या सून व मुलगा युवक काँग्रेसचे माजी शहराध्यश नरेश पाटील, मनसेच्या माजी नगरसेविका नंदिनी बोडके यांच्या भाजप प्रवेशाने तसेच मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी भाजपत याआधीच प्रवेश केल्याने मनसे व काँग्रेस यांच्या माजी नगरसेवकांची संख्या शून्यावर गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

Nashik Latest News

भाजप एकनिष्ठांची नाराजी

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. पंचवटी विभागात भाजप २४ पैकी २४ जागा जिंकण्याचा तयारीत असल्याचे यातून दिसून येत आहे. मात्र विरोधकांचे मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये होणारे इनकमिंग पाहता भाजपातील एकनिष्ठांच्या नाराजीत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोणाचा पत्ता कट होणार

मागील वेळेस भाजपकडून निवडणूक लढलेल्या, माजी नगरसेवक तसेच विद्यमान आमदारांचे समर्थक असलेल्या प्रभाग पाचमधील अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर आजच्या प्रवेशाने पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भाजपातील इच्छुकांची अडचण निर्माण झाली आहे. आता नेमके कोणाचा पत्ता कट होणार ही येणारी वेळेच सांगू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT