नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सात मजली नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे देखील उपस्थित होते.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik Politics : भुजबळ-कोकाटे एकाच रांगेत; बोलणे मात्र टाळले

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सात मजली नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सात मजली नूतन इमारतीच्या लोकार्पणानिमित्त पोलिस कवायत मैदान येथे आयोजित सोहळ्यासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते. दोघेही एकाच रांगेत बसले. मात्र, एकमेकांशी बोलणे टाळल्याने, एकच चर्चा रंगली.

सोहळ्यात व्हीआयपी पाहुण्यांसाठी व्यासपीठाच्या समोरील रांगेत आसन व्यवस्था करण्यात आली होती. सर्वप्रथम मंत्री कोकाटे कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी रतन लथ यांच्यासह उपस्थितांनी त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर कार्यक्रमस्थळी आले. या दोघांनी मंत्री कोकाटे यांच्याशी हस्तांदोलन केले. काही वेळात मंत्री भुजबळ कार्यक्रमास्थळी पोहोचले. भुजबळांना बघताच मंत्री झिरवाळ यांनी त्यांच्याकडे धाव घेत, हस्तांदोलन व आशीर्वाद घेतले. तसेच आमदार खोसकर, डॉ. रवींद्र सपकाळ यांनी भुजबळांशी हस्तांदोलन केले. मात्र, मंत्री कोकाटे यांनी जागेवरून उठणे टाळले. मंत्री कोकाटे ज्या सोफ्यावर बसले होते, त्याच सोफ्याशेजारी असलेल्या सोफ्यावर भुजबळ बसले होते. त्यांच्या बाजूला सपकाळ आणि कोकाटे यांच्या बाजूला रतन लथ बसले होते. मात्र, दोघांनी बोलणे सोडाच, पण एकमेकांकडे बघणेही टाळले. काही वेळाने खा. राजाभाऊ वाजे पोहोचले.

मंत्री भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर कोकाटे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर कोकाटे यांचे कृषिखाते गेल्यानंतर भुजबळ यांनी कोकाटेंचा समाचार घेतला होता. दोघांमधील कलगीतुरा वाढतच असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना समज दिली होती. त्याबाबत कोकाटे यांनी गेल्या आठवड्यातच माध्यमांशी बोलताना, भुजबळांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. पण, कलगीतुरा नको, भुजबळांबाबत भाष्य करू नये, असा पक्षाकडून मला आदेश आला आहे. त्यांच्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे, असे स्पष्ट केले. दरम्यान, दोघांनीही एकमेकांना टाळल्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच चर्चा रंगली होती.

मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती; आमदारांची दांडी

लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. मात्र, मुख्यमंत्री दिल्लीत असल्याने ते सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाही. तसेच राज्यातील पूरस्थिती बघता, दोन्ही उपमुख्यमंत्री बांधावर असल्याने त्यांनाही सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही. मात्र, ज्यांच्या मतदारसंघात हा भव्य कार्यक्रम होता, त्या भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मात्र सोहळ्यास दांडी मारल्याची चर्चा रंगली होती. आमदार सीमा हिरे, सरोज आहिरे, हिरामण खोसकर यांना वगळता इतरांनीही दांडी मारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT