नाशिक : येवला तालुक्यात मंत्री छगन भुजबळ यांचे प्रबळ राजकीय विरोधक समजले जाणारे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी शुक्रवारी (दि. 23) रात्री उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
नरेंद्र दराडे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना (उबाठा)ला मोठा धक्का बसला आहेच पण, त्याचबरोबर दराडे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने येवल्यात भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न केल्यामुळे महायुतीतही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था गटामधून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र दराडे यांना आमदारकीची संधी दिली होती. अलीकडेच त्यांच्या आमदारकीची मुदत संपली. त्यांचे बंधू किशोर दराडे हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे नरेंद्र दराडे हेदेखील शिंदे गटात जाणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. किंबहुना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर लगेचच विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता या निवडणुकीत महायुतीचा जोर राहण्याची शक्यता असल्यामुळे तसेच महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे जाणार असल्यामुळे दराडे हे शिंदे गटात जाणार हे सर्वश्रुत होते. शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रसंगी शिंदे गटाच्या नेत्या मीना कांबळी, आमदार किशोर दराडे, सचिव राम रेपाळे, उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते.
आमदार नरेंद्र दराडे यांच्यासमवेत माजी नगरअध्यक्ष रामदास दराडे, माजी सभापती डॉ. सुधीर जाधव, नगरसेवक दयानंद जावळे, अनिल जैन, अंबादास कस्तुरे, उत्तम आहेर, सरपंच भानुदास गायकवाड, खरेदी- विक्री संघाचे संतोष वैद्य, महिला आघाडीप्रमुख वर्षा देशमुख तसेच उबाठा, मनसे, राष्ट्रवादी पक्षाचे पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच आदींनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे येवला तालुक्यात शिंदे गटाला मोठे बळ मिळाले आहे.
मी जे बोलतो, ते करून दाखवतो. येवलावासीयांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी पालखेड धरणातून थेट पाइपलाइन ही योजना राबवून पाणीपुरवठा करण्यात येईल. येवला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवून रोज पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी दराडे यांच्या पक्षप्रवेशप्रसंगी सांगितले.
येवला तालुका अनेक वर्षांपासून दुष्काळी तालुका आहे. गेली 25 वर्षे पाठपुरावा करूनदेखील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आठवड्यातून एकदा पिण्याचे पाणी सर्वसामान्यांना मिळते. शेतकऱ्यांचेही हेच हाल आहेत. रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे झालेली नाहीत. नगरपालिकेच्या गाळ्यांचा प्रश्न कायम आहे. येवलेकरांना न्याय देण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केला आहे.नरेंद्र दराडे, माजी आमदार