नाशिक

Nashik Politics | बडगुजर, गितेंच्या प्रवेशावरून भाजपत नाराजीनाट्य

पदाधिकारी, नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री यांच्याकडे वाचला तक्रारींचा पाढा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शिवसेना उबाठातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर व स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्या भाजप पक्ष प्रवेशापूर्वीच अंतर्गत विरोध सुरू झाला आहे.

पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील डझनभर माजी नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत बडगुजर यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला आहे. तर नाशिकमध्ये पूर्व विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांची भेट घेत गिते यांच्या घरवापसीला विरोध केला आहे. त्यामुळे संभाव्य भाजप प्रवेशावरून पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले आहे.

शिवसेना उबाठाचे उपनेते बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. बडगुजर यांनी भूमिका घेण्याच्या आत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली. बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा वाढल्यानंतर आ. सीमा हिरे यांनी विरोध केला. मात्र, आगामी मनपा निवडणूक पार्श्‍वभूमीवर शंभर प्लसचा नारा देणाऱ्या भाजपमध्ये सर्वांना प्रवेशद्वार खुले असल्याचे वक्तव्य करत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नाशिकची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजनांकडे असल्याचे सांगितले होते. दरम्यान, मंगळवारी (दि. १०) बडगुजर यांचा पक्षप्रवेश निश्‍चित मानला जात होता. त्यापूर्वी नाराजींची मोट बांधत आमदार हिरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व बावनकुळे यांची भेट घेत विरोध केला. बडगुजर यांच्या विरोधात काही पुरावे यावेळी सादर केल्याचे सांगण्यात येत आहे.

गितेंविरोधात माजी नगरसेवकांनी थोपटले दंड

नाशिक पूर्वमधूनही गिते यांच्या पक्ष प्रवेशालाही माजी नगरसेवकांनी विरोध केला आहे. पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, सुरेश खेताडे, दिनकर आढाव, संभाजी मोरुस्कर, अरुण पवार, पंडित आवारे, प्रशांत जाधव, नाना शिलेदार यांनी शहराध्यक्ष केदार यांची भेट घेत दोघांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला. बडगुजर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून, यामुळे पक्षाचे नुकसान होईल, तर गिते यांच्या विरोधातही अनेक तक्रारी असल्याने दोघांनाही प्रवेश नको अशी भूमिका मांडली. तसेच अन्य पक्षांतील लोकांना प्रवेश देताना धोरण ठरविण्याची मागणी करण्यात आली.

बडगुजर व गिते यांच्या प्रवेशाबाबत पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यक्त केलेल्या भावना वरिष्ठांकडे पोहोचविणार आहे.
सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप
बडगुजर यांच्यावर २९ गुन्हे आहेत. त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होईल. त्यांच्याविरोधात मोठी नाराजी आहे. ती पुराव्यासह पक्षश्रेष्ठींकडे मांडली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बडगुजर यांना पक्षप्रवेश देणार नसल्याचे सांगितले आहे.
सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम मतदारसंघ
पक्षविरोधात काम करणाऱ्यांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यांचा निर्णय मान्य राहील.
ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT