नाशिक : एकीकडे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली असताना, ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनीही नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सोमवारी (दि. २) घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत हे नाशिकमध्ये असताना बडगुजर यांनी ही भेट घेतल्यामुळे ठाकरे गटाचे दोन्ही बुरूज ढासळणार का, या प्रश्नाने उचल घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बडगुजर हे अस्वस्थ आहेत. निवडणूक काळात त्यांच्या कुटुंबीयांवर झालेले राजकीय आघात, दाखल झालेले गंभीर गुन्हे यामुळे बडगुजर व्यथित आहेत. दरम्यानच्या काळात ते शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, 'मातोश्री'वरून बडगुजर यांची समजूत काढली गेली. जिल्हाप्रमुख पदावरून त्यांना उपनेते पदावर बढती देण्यात आली. त्यामुळे बडगुजर यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर पडदा पडला होता. दरम्यान, नाशिकच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर बडगुजर यांच्या पक्षांतराच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.
श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, या भेटीबाबत बडगुजर यांना विचारले असता, नाशिक महापालिकेतील प्रलंबित नोकरभरतीसह कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. महापालिकेत विविध संवर्गांतील ३,६०९ रिक्त पदे आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रिक्त पदांच्या भरतीला शासनाने परवानगी द्यावी. महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधाला मंजुरी द्यावी. महापालिकेतील वर्ग १ व २ मधील अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या झाल्या. मात्र, वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या प्रलंबित आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेला नाही. यासंदर्भात आयुक्तांना आदेश द्यावेत, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती बडगुजर यांनी दिली.
बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना महापालिकेतील प्रलंबित नोकरभरतीसह विविध प्रश्नांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यावेळी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देताना, लवकरच पुन्हा भेटू, असा सूचक संदेश फडणवीस यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
महापालिकेतील प्रलंबित नोकरभरतीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यात कुठलाही राजकीय मुद्दा नव्हता. राजकीय चर्चा बंद दरवाजाआड होतात. मी उघडपणे सर्वांसमक्ष भेट घेतली.सुधाकर बडगुजर, उपनेते, ठाकरे गट.