

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत सामील व्हावे, मनसेशी युती करावी की, स्वबळ आजमावे यासंदर्भात शिवसेनेच्या 'उबाठा' गटाने चाचपणी सुरू केली आहे. यासाठी ग्राउंड रिॲलिटी जाणून घेण्यासाठी उबाठातर्फे वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या असून, उपनेते सुधाकर बडगुजर यांच्याकडे पुणे आणि नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीसर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यभरातील महापालिकांवर भगवा फडकविण्यासाठी उबाठा गटानेदेखील पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उबाठाच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. या निवडणुका उबाठा गट महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार, मनसेशी युती होणार की स्वबळावर निवडणुका लढविणार याबाबत स्थानिक पातळीवरील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यात उपनेते, जिल्हाप्रमुख आणि पक्षाच्या नेत्यांवर कुठली जबाबदारी राहील याची विभागणी करण्यात आली. या बैठकीत २९ महापालिकांचे नियोजन करण्यात आले. महाविकास आघाडी अथवा स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी चाचपणी करण्याकरिता काय कार्यपद्धती राहील याची चाचपणी करण्यात आली. नाशिक व पुण्याची जबाबदारी पक्षाने बडगुजर यांच्यावर सोपविली आहे.
स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून महाविकास आघाडी, युती अथवा स्वबळावर याबाबत निर्णय घेण्यात येईल. आजच त्यावर भाष्य करता येणार नाही. वरिष्ठ सकारात्मक आहेत. स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतले जातील. त्यासाठी चाचपणी करण्याचे निर्देश पक्षाने दिले आहेत.
सुधाकर बडगुजर, उपनेता, उबाठा गट, नाशिक.
मनसेसोबत युती होणार का या विषयावरही या बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले, अशी माहिती देताना बडगुजर म्हणाले की, राजकारणात कधीही काहीही घडते, आजचा शत्रू उद्याचा मित्र होते. आणि मित्रही विरोधक बनू शकतो. आगामी काळच ठरवेल महाराष्ट्राचे राजकारण कसे असेल. सकारात्मक दृष्टीने विचार केला तर युती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले