नाशिक/ सातपूर : उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस सातपूर विभागात चांगलाच गाजला. उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज सादर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून साेडला. दोन पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने, तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी धाव घेत, कार्यकर्त्यांना शांत केले. शेवटच्या दिवशी ११२ उमेदवारांनी १४५ अर्ज दाखल केले. आतापर्यंत सातपूर विभागातील चार प्रभागातून तब्बल ३०५ अर्ज दाखल झाले.
सातपूर विभागीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी बहुतांश उमेदवारांनी रॅली काढत शक्तीप्रदर्शन करीत, अर्ज दाखल केले. कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिसांनी काही मार्गात बदल केला होता. पोलिसांनी विभागीय कार्यालयाच्या चहुबाजुने बॅरिगेडींग करीत, उमेदवार आणि त्यांचे सूचक, अनुमोदक यांनाच प्रवेश दिला. त्यामुळे पोलिस आणि उमेदवार कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची देखील झाली. 'शक्ती दाखविण्याची घाई आणि नियमांची मर्यादा' यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चिडचिड झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पहिल्या दिवशी केवळ ११ अर्ज दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी १४९ आणि तिसऱ्या दिवशी १४५ अर्ज दाखल झाल्याने शेवटच्या दिवसांपर्यंत पक्ष आणि उमेदवारांकडून डावपेच खेळले जात असल्याचे स्पष्ट झाले.
बुधवारी (दि.३१) उमेदवारी अर्जांची छानी होणार असून, २ जानेवारीला माघार असून, त्यानंतरच खऱ्या लढती समोर येणार आहेत. ३ जानेवारी रोजी चिन्ह वाटप होणार असून, त्यानंतरच प्रचाराचा धुराळा उडवून दिला जाणार आहे. मात्र, तत्पूर्वीच सातपूर विभागातवातावरण तापले आहे.
चारचे पॅनल, पाच एबी फार्म
प्रभाग १० मध्ये भाजपच्या एबी फॉर्मवरून शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी उघड झाली. अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्याच्या काही मिनिटे आधीच भाजपाच्या पाचव्या उमेदवार जान्हवी तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आल्याने त्यांचे पती मनोज तांबे यांनी अक्षरशः धावपळ करत अर्ज दाखल केला. परिणामी, चार जागांसाठी पाच एबी फॉर्म दाखल झाल्याने आता पक्षाची अधिकृत उमेदवारी कुणाला दिली जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शशिकांत जाधव यांची अपक्ष उमेदवारी
मनसे आणि भाजपकडून सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या शशिकांत जाधव यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने, त्यांनी बंडखोरी करीत प्रभाग क्रमांक १० मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जाधव यांच्या बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अशात त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता असून, जाधव निवडणुक लढविण्यावर ठाम आहेत.
काकड यांनी केला आमदारांच्या गाडीचा पाठलाग
प्रभाग क्रमांक १० मधून भाजपकडून इच्छुक असलेल्या व सातपूर मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या भगवान काकड यांना उमेदवारी नाकारल्याने, त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. एबी फॉर्म मिळविण्यासाठी त्यांनी शहराध्यक्ष सुनील केदार तसेच आमदारांच्या गाडीचा पाठलाग केला. निष्ठावंतांना नाकारले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
पोलिसांचा बंदाेबस्त, तरीही तणाव
अनुचित प्रकार टाळण्यासाठी सातपूर पोलिसांनी चोख बंदाेबस्त ठेवला होता. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी घटनास्थळी खडा पहारा देत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. मात्र, अशातही उमेदवारासोबत कार्यकर्त्यांना जाण्याची इच्छा असल्याने, प्रवेशद्वारावर काही काळ तणाव झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी दंडुका काढताच कार्यकर्त्यांची पळापळ झाल्याचेही दिसून आले.
प्रकाश लोंढे यांचा उमेदवारी अर्ज
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेले रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी अनुमोदकातर्फे प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रकाश लोंढे हे गेल्या दोन महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांच्या वतीने अनुमोदक यांनी अर्ज दाखल केला. माघारीमध्ये जर लोंढे यांनी अर्ज मागे घेतला नाही तर तुरूंगातून निवडणूक लढवतील. तसेच यावेळी त्यांच्या सुन माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत, अर्ज सादर केला. रिपाईकडून प्रभाग ११ मध्ये प्रकाश लोंढे, दीक्षा लोंढे, नंदीनी जाधव मैदानात आहेत.