

नाशिक : महापालिका निवडणुकीत मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ठेंगा दाखवित स्वबळ आजमाविणाऱ्या भाजपमध्ये निष्ठावंतांच्या नाराजीचा आगडोंब उसळला. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचे वाटप सुरू केल्यामुळे उमेदवारी डावलल्या जाण्याच्या भीतीने सैरभैर झालेल्या इच्छुकांचा संयम सुटल्यामुळे भाजपमध्ये उघड उघड राडा झाला. इच्छुकांचा संताप इतका टोकाला पोहोचला की, शहराध्यक्षांच्या वाहनांचा पाठलाग, घोषणाबाजी, प्रवेशद्वार फोडण्याचा प्रयत्न आणि महामार्गावर थरारक दृश्य दिसले. तिकीटवाटपाचा हा गोंधळ आता राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी (दि. 30) होता. भाजपकडे सर्वाधिक १,०६७ इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्यामुळे १२२ जागांसाठी उमेदवारी निश्चित करताना भाजप नेत्यांची दमछाक झाली. बंडखोरी उसळण्याच्या भीतीमुळे भाजपने कोणतीही अधिकृत उमेदवारी यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचे वाटप सुरू केले. सकाळपासून 'आपल्याला फॉर्म मिळेल' या आशेवर असलेले शेकडो इच्छुक अचानक डावलले गेले आणि त्यातूनच असंतोषाचा उद्रेक झाल्याचे सांगण्यात येते. नाशिक - मुंबई महामार्गावरील विल्होळी येथील एका बंगल्यातून शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या माध्यमातून एबी फॉर्मवाटप सुरू असल्याची माहिती बाहेर येताच इच्छुकांनी तिथे धाव घेतली. उमेदवारी न मिळालेल्यांनी थेट घोषणाबाजी करीत प्रवेशद्वाराला लाथा मारत काही जण आत घुसले. 'निष्ठावंतांना डावलले' असा आरोप करत वातावरण अक्षरशः पेटले.
एबी फॉर्म घेऊन शहराध्यक्ष सुनील केदार आणि आमदार सीमा हिरे निघाल्याचे समजताच संतप्त इच्छुकांनी त्यांच्या वाहनांचा पाठलाग केला. मुंबई - आग्रा महामार्गावर काही काळ तिकीटवाटपाचा थरार पाहायला मिळाला. इच्छुकांच्या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकही अडचणीत सापडले होते.
बाहेरच्यांना तिकीट, निष्ठावंतांना डावलले
भाजपने निवडणुकीआधी विरोधी पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश दिल्यामुळे आधीपासूनच असंतोष खदखदत होता. ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी तब्बल १,०६७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. महायुती फुटल्यामुळे सर्व जागा भाजप लढविणार या अपेक्षेवर अनेकांनी तयारी केली होती. मात्र, प्रत्यक्षात निष्ठावंतांना बाजूला सारून बाहेरून आलेल्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
तिकिटांचा काळाबाजार
या गोंधळाला आणखी धार देत काही इच्छुकांनी थेट तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. 'तिकीट नक्की' असे सांगूनही शेवटपर्यंत एबी फॉर्म मिळाला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. या आरोपांमुळे भाजपच्या अंतर्गत कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पोलिस बंदोबस्तात वाटप, आयुक्त घटनास्थळी
वाढता तणाव आणि संभाव्य अनुचित प्रकार लक्षात घेता, भाजपकडून पोलिस बंदोबस्तात एबी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले. शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले व सीमा हिरे यांच्या उपस्थितीत पुढील प्रक्रिया पार पडली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक स्वतः घटनास्थळी दाखल होत गर्दी पांगविली.
भाजपमधील अंतर्गत कलह उघड
एबी फॉर्मवरून झालेल्या या राड्यामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि तिकीटवाटपातील गोंधळ उघडपणे समोर आला. निवडणुकीच्या तोंडावरच पक्षात उसळलेला हा असंतोष भाजप नेतृत्वासाठी मोठा इशारा मानला जात आहे. महापालिका निवडणूक अधिकच तापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
फार्म हाऊसमध्ये हाणामारी
एबी फॉर्म वाटपावरून राडा होण्यापुर्वी फार्म हाऊसवर पक्षांतर्गत गटबाजीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजप मध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या सिडकोतील एका नेत्याकडे चार एबी फॉर्म दिल्याने जेष्ठ नेते संतापले. त्यातून शाब्दीक चकमक उडाली. प्रकरण हातघाईवर गेले. दोन्हीकडचे समर्थक एका खोलीत भिडले त्यातून तणाव वाढल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. सिडकोत संध्याकाळ पर्यंत राड्यावरून पोलिसांकडून चौकशी सुरु होती.
२०१७ ची पुर्नरावृत्ती
सन २०१७ मध्ये शिवसेनेत हॉटेल एसएसके मध्ये असाचं राडा पाहायला मिळाला होता. हाणामारी पर्यंत प्रकरण पोहोचले. शिवसेनेकडून निश्चित करण्यात आलेले एबी फॉर्म फाडून टाकले होते त्याचा फटका निवडणुकीत शिवसेनेला बसला. तसाचं प्रकार भाजपच्या बाबतीत घडल्याने सन २०१७ पुर्नरावृत्ती नाशिककरांना पाहायला मिळाली.
आम्ही ३५ जागांवर लढायच का?
महायुती संदर्भात आम्ही शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेने ५० जागा मागितल्या तर राष्ट्रवादीने ३५ जागा मागितल्या. आम्ही २० ते २५ जागा द्यायला तयार होतो. शिवसेना आणि राष्ट्रवादीला ८५ जागा दिल्या तर, आम्ही ३५ जागांवर लढायचे का? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. आमच्याकडे ७८ माजी नगरसेवक होते. इच्छूकांची संख्या अधिक होती. महायुतीत जागावाटपाचे गणित जुळत नव्हते. त्यामुळेच महायुती फिस्कटून आम्ही वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. युती केली असती तर आम्हाला मुंबईतून एबी फॉर्म वाटावे लागले असते असे सूचक विधानही त्यांनी केले.
३३ आयारामांवर मेहरबानी
पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपने २५ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारतांना ३३ आयारामांना रेड कार्पेट घातले आहे.अन्य पक्षातून आलेल्या गुरुमीत बग्गा,शाहू खैरे,यतीन वाघ,विनायक पांडे,दिनकर पाटील,नयना घोलप,सुधाकर बडगुजर अशा दिग्गजांसह अन्य पक्षातून आलेल्या ३३ जणांना उमेदवारी बहाल केली आहे.निष्ठावंताना डावलून आयारामांना घातलेल्या या रेड कार्पेटमुळे निवडणूकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तिकीटवाटपातील अर्थव्यवहाराचा इन्कार
नाशिक : येथे उमेदवारीवाटपावरून जे झाले, ते अतिशय चुकीचे झाले. या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाईल. यासाठी कोणी खतपाणी घातले, त्याचीही माहिती घेतली जाईल. संपूर्ण प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातला जाईल, अशी माहिती भाजपचे प्रभारी तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्यांनी उमेदवारीवाटपात अर्थव्यवहार झाल्याच्या आरोपांचा इन्कार केला.
एबी फॉर्मवाटपावरून भाजपमध्ये झालेल्या राड्यानंतर महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एबी फॉर्मवाटपावरून जे झाले, ते अतिशय चुकीचे झाले. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ३१ प्रभागांमधील १२२ जागांसाठी भाजपकडे इच्छुकांची संख्या हजारावर होती. अनेक जण इच्छुक होते. प्रत्येकाला तिकिटाची अपेक्षा होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला ही वस्तुस्थिती आहे, अशी कबुली देताना अशा प्रकारे हातघाईवर येणे दुर्दैवी असून, पक्षशिस्तीचा भंग करणारे आहे. तिकिटासाठी शहराध्यक्षांच्या वाहनांचा पाठलाग करणे अयोग्य आहे. या प्रकाराला कोण खतपाणी घालत होते, याचीही चौकशी केली जाईल, असे महाजन म्हणाले. उमेदवारीवाटपात अर्थव्यवहार झाल्याचा तसेच दोन - तीन जणांनी उमेदवारीवाटपाचा निर्णय घेतल्याचा आरोप महाजन यांनी फेटाळून लावला. पक्षाने इच्छुकांचे नियमानुसार अर्ज भरून घेत मुलाखती घेतल्या. त्यासंदर्भातील अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर त्रिस्तरीय सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार इलेक्टिव्ह मेरिटनुसार उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही काहींच्या तक्रारी असतील, तर त्याचीही चौकशी केली जाईल. मात्र, हवेत काहीतरी आरोप करणे चुकीचे आहे. तिकीट कापले गेल्यामुळे काही जण चुकीचे आरोप करीत आहेत, असे महाजन म्हणाले. पक्षात बाहेरून अनेक लोक आले आहेत. परंतु, उमेदवारीवाटप करताना जुन्या लोकांनाही प्राधान्य देण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.