Nashik Drugs Raid 
नाशिक

Nashik Drugs Raid 2026 | अडीच वर्षांत 2.35 कोटींचे ड्रग्ज शहर पोलिसांकडून जप्त

Nashik Drugs Raid 2026 | अमली पदार्थांविरोधात विशेष मोहिमेला मिळाले मोठे यश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक, पुढारी वृत्तसेवा

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेमुळे गेल्या अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. वर्ष २०२४ ते जून २०२६ या कालावधीत एकूण ८४ गुन्हे दाखल करून १८२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच विविध प्रकारच्या अमली पदार्थांचा २ कोटी ३५ लाख १० हजार २८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एमडी (मेफेड्रॉन), गांजा, चरस, अफेटामाइन व भांग यांसारख्या अमली पदार्थांच्या विक्री, वाहतूक व साठवणुकीविरोधात सातत्याने कारवाया करण्यात येत आहेत.

२०२४ मध्ये २७ गुन्हे दाखल करून ६० आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०२५ मध्ये ३८ गुन्ह्यांमध्ये ८४ आरोपींना अटक करण्यात आली. तर २०२६ मध्ये आतापर्यंत १९ गुन्ह्यांची नोंद होऊन ३८ आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे २०२६ मध्ये एमडी, गांजा, अफेटामाइन आणि भांग यांसारख्या अमली पदार्थांचा एक कोटी २१ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा अधिक आक्रमकपणे कारवाई करत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

अमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे सुद्धा आमच्याकडून कौन्सिलिंग केली जाईल. अमली पदार्थ बाळगणाऱ्यांसंदर्भात नागरिकांना काही माहिती मिळाल्यास निर्भीडपणे पोलिस यंत्रणेशी संपर्क साधावा त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल
- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT