पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरु असून गोळाफेकीत उमेदवार आघाडीवर आहेत.  File Photo
नाशिक

Nashik Police Recruitment|धावण्यापेक्षाही गोळाफेकीत उमेदवार आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर व ग्रामीण पाेलिस दलाच्या पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरु असून मैदानी चाचणीत १०० व १६०० मीटर धावणे, गोळाफेक यांचा समावेश आहे.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शहर व ग्रामीण पाेलिस दलाच्या पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरु असून मैदानी चाचणीत १०० व १६०० मीटर धावणे, गोळाफेक यांचा समावेश आहे. बहुतांश उमेदवारांनी धावण्यापेक्षाही गोळाफेकीत जास्त गुण पटकावत असल्याचे गुणतालिकेवरून दिसत आहे. काही उमेदवारांना पैकीच्या पैकी गुण मिळत असल्याने त्यांचा हुरुपही वाढला आहे. तर काही उमेदवारांना धावण्यात एकही गुण मिळत नसल्याचेही आढळून आले.

  • नाशिकमध्ये पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे.

  • १९ जूनपासून शहर व ग्रामीण दोन्ही दलातील मैदानी चाचणीला सुरुवात करण्यात आली.

  • उमेदवारांनी गोळाफेकीत जास्त गुण पटकावल्याचे गुणतालिकेवरून दिसत आहे.

किती उमेदवारांनी केले आहेत अर्ज?

शहर पोलिस दलात ११८ जागांसाठी पाच हजार ५९० पुरुष, दोन हजार १२५ महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर ग्रामीण दलात ३२ जागांसाठी दोन हजार ६०२ पुरुष, ५७६ महिला, ४२ माजी सैनिक व इतर पाच उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत. १९ जूनपासून दोन्ही दलातील मैदानी चाचणीला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार शहर पोलिसांची चाचणी हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडिअमवर तर, ग्रामीण पोलिसांची चाचणी आडगाव येथील अधीक्षक कार्यालयासमोरील कवायत मैदानावर होत आहे.

अनेकांची छाती फुगवताना दमछाक

चाचणी येणाऱ्या उमेदवारांना सोळाशे व शंभर मीटर धावणे व गोळाफेक या तीन चाचण्या पूर्ण करायच्या आहेत. तसेच उंची व छातीची मोजमापही केली जात आहे. काही उमेदवार हे उंची व छातीच्या मोजमापच्या निकषांत बसत नसल्याने ते अपात्र ठरले आहेत. पोलिसांच्या मैदानी चाचणी परिक्षेत एकाही उमेदवाराला पन्नासपैकी पन्नास गुण मिळालेले नाहीत. तर २९ जूनपर्यंत मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल समोर येईल. मात्र, बहुतांश उमेदवारांना चाळीस ते सत्तेचाळीस गुण मिळाल्याने यंदाचे मेरीट उंचावण्याची शक्यता आहे.

म्हणून गैरहजेरी वाढली

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अनेक ठिकाणी अर्ज केले आहेत. एकापेक्षा जास्त घटकांत दोन स्वतंत्र पदांसाठी अर्ज दाखल केलेल्यांचे हमीपत्र घेण्यात आले आहे. त्यांना दोन्ही ठिकाणी मैदानी चाचणी देता येणार आहे. त्यामुळे मैदानी चाचणीअंती ज्या ठिकाणी चांगले गुण मिळतील, तेथेच लेखी परीक्षा देण्याच्या निर्णय उमेदवार घेत आहेत. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात अपेक्षित यश मिळाल्यास उमेदवार दुसऱ्या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी गैरहजर राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गैरहजर उमेदवारांची संख्या अधिक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT