नाशिक : शिस्तप्रिय शासकीय विभाग म्हणून पोलिस दलाकडे पाहिले जाते. मात्र गेल्या महिन्यात सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी एकमेकांना शिवीगाळ करीत हाणामारी केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे या दोघांनाही तातडीने दंगल नियंत्रण पथकात रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र दोघेही कागदोपत्री दंगल नियंत्रण पथकात हजर मात्र पोलिस ठाण्यातच वावरत होते. त्यानंतरही या दोघांवर कारवाई न करता पुन्हा पोलिस ठाण्यात नियुक्ती केली आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
सरकारवाडा पोलिस ठाण्यातील दाेन सहायक पोलिस उपनिरीक्षकांमध्ये महिनाभरापूर्वी पोलिस ठाण्यासमोरच फ्री स्टाईल झाल्याची चर्चा होती. वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांच्यातील वाद मिटला. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तालयाने दोघांची तडकाफडकी दंगल नियंत्रण पथकात बदली केली. त्यांना तातडीने तेथे हजर होऊन कर्तव्य बजाविण्याचे आदेश दिले. मात्र दोघांनीही कागदोपत्री नवीन जबाबदारी स्विकारत सरकारवाडा पोलिस ठाण्यातच कामकाज करण्यात धन्यता मानली. त्यास वरिष्ठांनीही विरोध न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यामुळे दोघांचे पुनर्वसन होईल, अशी चर्चा आयुक्तालयात रंगली होती. महिन्याभरात दोघांनाही पुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात नियुक्त केले आहे. त्यामुळे कागदोपत्री झालेली बदली कागदावरच राहिल्याचे दिसून आले.