Nashik Exam Curfew 
नाशिक

Nashik Exam Curfew | नाशिकमध्ये परीक्षा केंद्रांवर 'कलम 144' लागू; 10 फेब्रुवारीपासून जमावबंदीचे आदेश

Nashik Exam Curfew | नाशिक ग्रामीण कार्यक्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित परीक्षांदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नाशिक व ग्रामीण पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ग्रामीण कार्यक्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित परीक्षांदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नाशिक व ग्रामीण पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

नाशिक शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व ग्रामीणमध्ये पोलिस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी बाळासाहेब पाटील यांनी परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत (परीक्षेच्या दिवशी) सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत लागू राहणार आहे.

परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारापासून चारही दिशांना १०० मीटर परिसरात कोणत्याही अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. मात्र, परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक, अधिकृत अधिकारी, कर्मचारी तसेच ड्यूटीवरील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

अतिसंवेदनशील किंवा उपद्रवी परीक्षा केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून, अशा केंद्रांवर किमान पाच सदस्यांचे विशेष पोलिस पथक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक (भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, आई, वडील, पती किंवा पत्नी) परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास सक्त मनाई आहे. गरज भासल्यास परीक्षा केंद्र परिसरात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) व कलम १४४ लागू करण्याचे अधिकार पोलिस यंत्रणेला देण्यात आले आहेत.

या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर, एसटीडी आयएसडी बूथ, फॅक्स, सायबर कॅफे व तत्सम दूरसंचार साधने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच डिजिटल डायरी, मायक्रोफोन, सेल्युलर फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, मोबाइल, कॅलक्युलेटर, वायरलेस सेट, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच अग्निशस्त्रे व घातक शस्त्रे बाळगण्यास व वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

हा आदेश परीक्षा बंदोबस्तासाठी नेमलेले अधिकारी, अंमलदार व परीक्षेशी संबंधित कर्मचारी यांनाही लागू राहणार आहे. परिसरात पेट्रोलिंग ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT