Ganesh Visarjan Pudhari
नाशिक

Nashik Ganesh Visarjan 2026 | गणेश विसर्जनासाठी हव्यात 16 कलमी उपाययोजना

Nashik Ganesh Visarjan 2026 | पोलिस आयुक्तांचे मनपाला पत्र : विसर्जन मार्ग, घाटांवर प्रकाशयोजना; जीवरक्षक, बॅरिकेडिंगची गरज

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लाडक्या गणरायाला येत्या शुक्रवारी (दि. २५) निरोप दिला जाणार असल्याने गणेश विसर्जनाची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुका आणि विसर्जनस्थळांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना पोलिस आयुक्त कार्यालयाने महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून तब्बल १६ कलमी उपाययोजनांची यादी देण्यात आली आहे.

विसर्जनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मिरवणुका आणि विसर्जनस्थळी भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विसर्जन मार्ग तसेच घाटांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यासोबतच क्रेन आणि जीवरक्षक दलाची नियुक्ती करण्यास सांगण्यात आले आहे. घाटांवर अग्निशमन दलाचे पथक तैनात ठेवणे, जीवरक्षकांची नावे व संपर्क क्रमांक दर्शवणारे फलक लावणे, तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यावरही भर देण्यात आला आहे.

निर्मात्य संकलन, कृत्रिम तलावांची व्यवस्था

विसर्जनस्थळी निर्मात्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याबरोबरच घाट निसरडे होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मूर्तींची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन करण्यासह विसर्जनाच्या दिवशी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना करण्याचीही मनपाला कळविण्यात आले आहे.

अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र पथक

विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील हातगाड्या आणि अतिक्रमाणे हटवण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्याची सूचना करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले अनधिकृत पोस्टर्स व बॅनर्स हटवून मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

... १६ कलमी उपाययोजना

  • विसर्जन मार्ग व घाटांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था

  • क्रेन व जीवरक्षक दलाची नियुक्ती

  • अग्निशमन दलाचे पथक तैनात ठेवणे

  • जीवरक्षकांची नावे व संपर्क क्रमांकाचे फलक

  • गर्दी नियंत्रणाची व्यवस्था

  • आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग

  • हातगाड्या व अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र पथक

  • अनधिकृत पोस्टर्स व बॅनर्स हटविणे

  • धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीसा

  • धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी

  • निर्माल्य संकलनाची व्यवस्था

  • घाट निसरडे होऊ नयेत, यासाठी उपाययोजना

  • कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था

  • मूर्ती वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन

  • विसर्जनस्थळी आवश्यक सुरक्षाव्यवस्था

  • मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याची कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT