पिंपळगाव बसवंत (नाशिक) : पिंपळगाव बसवंत शहरात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले असून, महिन्याभरात तब्बल दीडशे पिंपळगावकरांना चाव घेतला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात चारवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांता भितीचे वातावरण आहे. कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
पिंपळगाव बसवंत आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधात्मक लस जेमतेम शिल्लक असल्याने अधिकच मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज श्वान दंशाचे आठ ते दहा रुग्ण उपचारासाठी येत आहेत. गेल्या महिन्याभरापासून कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या दीडशेवर पोहचली आहे. श्वान दंशाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेला त्यांच्यावर उपचार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच रेबीज लसीचा पुरेसा साठाही नसल्याने आरोग्य यंत्रणेची डोंकेदुखी वाढली आहे.
नाशिक व इतर ठिकाणाहून पकडलेली कुत्रे पिंपळगाव बसवंत शहराच्या सीमेवर सोडण्यात येत असल्याने या भागात भटक्या कुत्र्यांचा संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. आठवड्याभरापूर्वीच हिंस्र कुत्र्यांच्या हल्ल्यात कुंज गुप्ता या चिमुकल्याचा बळी गेला आहे. अंगणात खेळत, बागडत असताना कुंजवर कुत्र्यांनी हल्ला केला. मात्र, उपचारा दरम्यान कुंजचा रेबीज आजाराने मृत्यू झाल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. अरुण गचाले यांनी दिली.