river 
नाशिक

Nashik Godavari Nandini River | नंदिनी नदी वळविण्याच्या कामावर घेतला आक्षेप

Nashik Godavari Nandini River | न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी-नंदिनी संगम परिसरात सुरू असलेल्या विकासकामांवर गंभीर आक्षेप घेत जनहित याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्त तथा उच्च न्यायालय गठीत समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

नंदिनी नदीचे नैसर्गिक पात्र वर्षातील तब्बल आठ महिने कृत्रिमरीत्या वळवून (डायव्हर्ट करून) एसटीपीकडे नेले जात असल्याचा आरोप करत हे कृत्य मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे तसेच पर्यावरणीय नियमांचे थेट उल्लंघन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पंडित यांनी निवेदनात म्हटले आहे की, ज्या ठिकाणी गोदावरी आणि नंदिनी नदीचा त्रिवेणी संगम होतो, त्याच परिसरात कुंभमेळ्यासाठी घाट उभारणीचे काम सुरू आहे.

प्रत्यक्ष पाहणीत नंदिनी नदीचे संपूर्ण पाणी पावसाळ्याव्यतिरिक्त आठ महिने कृत्रिमरीत्या वळविले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नैसर्गिक संगमाची प्रक्रिया रोखली जात असून, हा प्रकार आध्यात्मिक, पर्यावरणीय आणि न्यायालयीन निकषांनुसार अयोग्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नंदिनी नदीतील मलजल संगमाच्या काही अंतरावर आणून नंतर नदीचे पात्र वळविण्याचा निर्णय तांत्रिकदृष्ट्या आणि पर्यावरणीय दृष्ट्या कितपत योग्य आहे, असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.

प्रस्तावित अंबड आणि सातपूर एसटीपी प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, तसेच नदीचे पाणी पंपिंगद्वारे वळविण्यामागील नेमका हेतू काय, याबाबतही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. सिंहस्थ पावसाळ्यात होणार असल्याने त्या काळात नंदिनीचे पाणी पुन्हा गोदावरीत मिसळणार असल्याचे नमूद करत, मलजलमिश्रित पाण्यात कोट्यवधी भाविकांना स्नान करावे लागणार का, असा थेट प्रश्न पंडित यांनी प्रशासनाला विचारला आहे.

काम तातडीने थांबविण्याची मागणी

न्यायालयीन आदेशांचे आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत संबंधित काम तातडीने थांबविण्याचे आदेश द्यावेत, तसेच हा प्रकार उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय उच्च न्यायालय गठीत समितीची तातडीने विशेष बैठक बोलावून संपूर्ण प्रकरणाचा पारदर्शक खुलासा करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT