Nashik Municipal Pudhari News Network
नाशिक

Nashik municipal election voting : गावठाणात मतदानाचा उत्साह; शहरी भागात मात्र निरुत्साह

शहरातील आमदारांनी मतदान केंद्रावर ठोकला तळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पंचवटी विभागात मखमलाबाद, म्हसरूळ सारख्या गावठाण भागात मतदारांचा उत्साह दिसून आला असला तरी, शहरी भागात मतदारांचा निरुत्साह होता. मखमलाबाद येथे आमदार हिरामण खोसकर यांच्या कन्या उमेदवार असल्याने ते ठाण मांडून होते. आमदार राहुल ढिकले आणि माजीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमंतिनी कोकाटे या देखील दिवसभर मतदारांना साद घालत होत्या. त्यामुळे येथे मतदारांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. मात्र, शहरातील प्रभागांमधील केंद्रावर फारसा उत्साह दिसला नाही. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची तुरळक गर्दी वगळता शुकशुकाट होता.

पंचवटी विभागात 1 ते 6 प्रभाग असून, या प्रभागांत बुधवारी (दि.15) सकाळी साडेसातला मतदानास सुरुवात झाली. शहरी भागातील केंद्रावर सकाळी मतदारांची गर्दी होती. त्यामुळे अनेक केंद्रांवर रांगा दिसल्या. परंतु, 12 नंतर, मतदारांची गर्दी ओसरली. दुपारी मतदार फिरकलेदेखील नाही. ही परिस्थिती साडेतीन ते चारपर्यंत होती. त्यानंतर गर्दी होण्यास सुरुवात झाली. गणेशवाडी येथील केंद्रावर माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुत्रासाठी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दिलीप खैरे हे बंधूसाठी ठाण मांडून होते. याउलट गावठाणातील मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी होती.

मखमलाबाद केंद्रावर सकाळपासून मतदारांचा उत्साह होता. बहुताशं उमेदवार गावातील असल्याने सारेच उमेदवार अन्‌‍ नेते यांनी केंद्राबाहेर गर्दी केली होती. मतदान करून घेण्याकडे कल दिसल्याने दिवसभर गर्दी होती. या केंद्रावर आमदार खोसकर यांच्या कन्या उमेदवार असल्याने कार्यकर्त्यांची मोठी यंत्रणा कार्यरत होती.

मतदार जादा असल्याने आमदार ढिकले देखील काहीकाळ होते. सीमंतिनी कोकाटे बंधूसाठी केंद्रावर दिवसभर होत्या. म्हसरूळ भागातील मतदान केंद्रावरील अशीच काहीशी परिस्थिती होती. मतदान केंद्रावर माजी सभापती गणेश गिते, माजी महापौर रंजना भानसी तळ ठोकून होते. पदाधिकाऱ्यांच्या गर्दीमुळे पोलिसांवर मोठा ताण होता.

प्रभाग 2 मध्ये ईव्हीएम बंद

प्रभाग 2 मध्ये आडगाव येथील मनपा शाळेत ईव्हीएम मशीनचे तीन बटन दाबले जात होते. एक बटन दाबले जात नसल्याने उमेदवारांनी हरकत घेतली. मशीन दुरुस्त करून वापरण्यात आले. यासाठी अर्धा तास मतदान प्रक्रिया बंद होती. तरीही सायंकाळी मतदारांची गर्दी दिसली नाही. मात्र, प्रशासनाने साडेपाचपर्यंत येणाऱ्या सर्व मतदारांचे मतदान करून घेण्याचे ठरवले होते.

आम्ही घरी निघून जातो

एकच घरातील मतदारांची मतदान केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने गोंधळ दिसला. मतदार यादीत नाव शोधताना मतदारांना धावपळ करावी लागली. काही मतदारांचे प्रभाग बदलण्यात आले. काहींच्या घराजवळचे मतदान केंद्र सोडून दुसऱ्या प्रभागाच्या हद्दीजवळ मतदान केंद्र देण्यात आले होते. मतदारांना मतदान करता आले नाही. त्यामुळे मतदारांनी थेट आम्ही घरी जातो, असे अधिकाऱ्यांना सुनावले.

संवेदनशील केंद्रावर शांततेत मतदान

पंचवटीतील संवेदनशील फुलेनगर, हिरावाडी केंद्रावर शांततेत प्रक्रिया पार पडली. हिरावाडी केंद्रावर मतदारांनी दुपारी मतदानासाठी गर्दी केलेली दिसली. सायंकाळी फारशी गर्दी नव्हती. दत्तनगर भागातील मतदान केंद्रावर साडेचारनंतर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT