

नाशिक : वय झालेले, साठी पार केलेली, थरथरणारे हात पाय, चालणेही कठीण, एकमेकांचा आधार घेत उठणे-बसणे अशी स्थिती असली तरी संविधानाने दिलेला अधिकार, लोकशाही उत्सवात सहभागी होणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे म्हणत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अपंग नागरिकांनी मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रांवर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला.
महापालिकेसाठी शहरभर मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानासाठी अनेकदा तरुण, मध्यमवयीन नागरिक जाण्यासाठी कंटाळा करतात. मतदान करणे म्हणजे जणू काय खूप मोठे श्रमाचे काम असल्यागत चित्र अनेकांचा चेहऱ्यावर दिसून येते. मात्र, वयस्कर ज्येष्ठांचा उत्साह आजही तरुणांना लाजवेल असाच असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान घेण्यात आले.
बीएलओ यांनी यापूर्वीच घरोघरी जात मतदान पावत्या दिल्या होत्या. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांनी त्यांना मतदानासाठी गृहभेटीद्वारे मतदान होईल का, यावर या निवडणुकीत निवडणूक आयोगाने तशी सुविधा ठेवली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे वय झाले म्हणून काय झाले, मतदान करणारच असा निर्धारच जणू काय ज्येष्ठ नागरिकांनी केला होता. अपंगांसाठी उमेदवारांनी खासगी वाहनांची व्यवस्था केली होती. कुटुंबातील सदस्यासोबत उमेदवारांचे कार्यकर्ते ज्येष्ठांना घेऊन येत होते.
आशासेविकांची नियुक्ती
ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग-अपंग मतदारासोबत कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराचा कार्यकर्ता असो की कुटुंबातील व्यक्तींनी मतदान केंद्रात व्हीलचेअरसोबत जाण्याची परवानगी नव्हती. मुख्य प्रवेशद्वारावरून व्हीलचेअरवर बसवून थेट मतदान केंद्र व मतदान केंद्रापासून प्रवेशद्वारापर्यंत ने-आण करण्यासाठी आरोग्य विभागातील आशासेविकांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली होती.