सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
विदर्भ, मराठवाडा तसेच शिर्डीकडून नाशिक, ओझर, वणी - सप्तशृंगी आणि गुजरातच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ या राज्यमार्ग रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सुमारे ८५ किलोमीटर लांबीच्या मार्गाला सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त मंजुरी मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासकीय पातळीवर दखल घेत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे घातले आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी या मार्गाचे महत्त्व आणि सध्याची गरज लक्षात घेऊन, आमदार माणिकराव कोकाटे आणि आमदार दिलीप बनकर यांच्या मागणीची दखल घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री तसेच कुंभमेळा प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार करून या प्रकल्पाला गती देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आमदार बनकर यांनी ओझर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात ही माहिती दिल्यानंतर, या महत्त्वाच्या प्रकल्पाचा विषय शासनाच्या वरिष्ठ पातळीवर पोहोचला आहे. रुंदीकरण कामाला तातडीने मंजुरी मिळून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जावा, अशी अपेक्षा नागरिक, शेतकरी आणि वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.
ओझर - खेरवाडी - चांदोरी - सायखेडा - भेंडाळी हिवरगाव - वडांगळी पंचाळे वावी- सायाळे जवळके डोहाळे - शिर्डी विमानतळ असा सुमारे ८५ किलोमीटरचा मार्ग अनेक ग्रामीण, कृषी, औद्योगिक आणि धार्मिक भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. सध्या मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने दुचाकी, चारचाकी, एसटी बस, मालवाहू वाहने आणि कृषी वाहतुकीमुळे प्रचंड गर्दी होत आहे. वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत या मार्गाची क्षमता अपुरी पडत आहे.
कुंभमेळ्यासाठी ठरणार पर्यायी वाहतूक मार्ग
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर - शिर्डी मार्गाचे महत्त्व अधिक वाढणार आहे. चांदोरीजवळ हा मार्ग छत्रपती संभाजीनगर नाशिक मार्गाला छेदतो, त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि शिर्डीकडून येणाऱ्या भाविकांना सिन्नर व नाशिक शहरातील गर्दी टाळून थेट सिंहस्थ कुंभमेळा स्नानाच्या ठिकाणांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. यामुळे कुंभमेळ्याच्या वाहतूक नियोजनात या मार्गाच्या रुंदीकरणाला मोठे महत्त्व आले आहे.
संगमनेरला झुकते माप; सिन्नर, निफाडचे कोणते पाप ?
एकीकडे संगमनेर तालुक्यातील वडगाव रा.मा. ५० ते निळवंडे, रा.मा. ६५ ते कौठे कमलेश्वर या रस्त्यासाठी २७ कोटी २५ लाख रुपयांचा मोठा निधी मंजूर केला जात असताना, ओझर - शिर्डीसारख्या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांना आणि अनेक महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या मार्गाच्या रुंदीकरणाला होणारा विलंब स्थानिकांमध्ये प्रश्न निर्माण करत आहे. आमदार कोकाटे आणि आमदार बनकर यांचा या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.