नाशिक : ओझर विमानतळावरून मंगळवारपासून (दि.२८) पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेल्या जयपूर, हैदराबाद विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. हैदराबादसाठी अगोदरच इंडिगो कंपनीकडून विमानसेवा सुरू असून, मंगळवारपासून (दि.28) सुरू करण्यात आलेल्या सेवेत हे दुसरे विमान आहे. याशिवाय जयपूरसाठी यापूर्वी विमानसेवा सुरू केली होती. मात्र, तांत्रिक कारणाने त्यात खंड पडला होता. नव्याने इंदूर-जयपूर सेवा सुरू केल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे.
सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगो एअरलान्सच्या माध्यमातून सेवा दिली जाते. नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू, इंदूर, गोवा आदी ठिकाणांसाठी सेवा दिली जाते. तेथून देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांसाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाही उपलब्ध आहेत. या सर्व सेवांना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या दिवाळी सुट्ट्यांमुळे विमानाचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यातच २६ ऑक्टोबरपासून नवी दिल्लीसाठी रात्रीचे दुसरे विमान सुरू झाले. त्यामुळे दिवसभरातील प्रवाशांच्या संख्येने विक्रमी उड्डाण केले. मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या या दोन्ही सेवांना प्रवशांचा मोठा प्रतिसाद लाभल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीसाठी दोन विमाने
नाशिकहून नवी दिल्लीसाठी दोन विमाने उपलब्ध करून दिली आहेत. नव्याने सुरू करण्यात आलेल्या फ्लाइट रात्री ८.५० वाजता असणार आहे. ते दिल्ली येथून सायंकाळी ६.२५ वाजता उड्डाण घेते व रात्री ८.२० ला नाशिकला पोहोचणार आहे. हे विमान रात्री ८.५० वाजता नाशिकहून दिल्लीला परतण्यासाठी झेपावणार आहे. तेथे ते १०.३५ वाजता पोहोचेल.