मालेगाव : पुर्वीचा काळ वेगळा होता, त्यामुळे पुर्वीच्या लोकांचे आजारांचे प्रमाणही कमी होते. आता मात्र भाजीपाला व फळांंवर होणारी जास्तीची औषध फवारणी यामुळे सकस आहाराचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव तसेच अपूर्ण व्यायाम यामुळे हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे प्रतिपादन व्हिजन हॉस्पिटल व लाईफ केअर हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. विक्रांत व्हिजन यांनी केले.
मालेगाव येथे आयोजित केलेल्या हृदय तपासणी शिबिरात डॉ. व्हिजन बोलत होते. यावेळी डॉ. व्हिजन म्हणाले की, वाढता कामाचा ताण, अवेळी जेवण, झोपण्याची वेळ नाही. त्यामुळे शरीरावर याचा विपरीत परिणाम होतो. या गोष्टींचे सामाजिक भान लक्षात घेऊन नाशिक येथील व्हिजन हॉस्पिटल व लाईफ केअर हॉस्पिटलने यांनी आयोजीत केलेल्या शिबिरात 200 हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी बरोबरच बीएसएल, टीएसएच, कोलेस्ट्रॉल, एचबीएवनसी, इसीजी, हाडांची ठिसुळता तसेच डॉक्टरांचा सल्ला सर्व विनामुल्य करण्यात आला. तसेच या शिबिरामध्ये हृदयविकाराविषयी समस्या असलेल्यांना २ डी इको, स्ट्रेस टेस्टही विनामुल्य करण्यात येणार असल्याचे डॉ. व्हिजन यांनी यावेळी सांगितले. या शिबिरासाठी नितीन दांगल, मुकेश थोरात, गणेश येवला, दीपक देशमुख, नीलेश बागले, भूषण देशपांडे , मयुर पाटे यांनी व लाईफ केअर हॉस्पिटलच्या आरोग्य टीमने परिश्रम घेतले.