नाशिक

Nashik Onion News : कांदाप्रश्नी पंधरवड्यात लासलगावी राज्यव्यापी महामेळावा

गणेश सोनवणे

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; कांदा निर्यातबंदीप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटना संघटित झाल्या आहेत. रविवारी (दि.२४) लासलगाव कृषी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेत, येत्या पंधरवड्यात 'स्वाभिमानी'चे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी व 'प्रहार'चे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ३० एकर जागेत कांदाप्रश्नी राज्यव्यापी महामेळावा घेण्याची घोषणा करण्यात आली. या मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवत लढा उभारण्याचा निर्धार केल्याची माहिती या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना या समविचारी शेतकरी संघटनेचे समन्वयक निवृत्ती गारे-पाटील यांनी दिली.

कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याचे बाजारभाव दोन ते अडीच हजार रुपयांनी कोसळले. सरासरी बाजारभाव बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी लासलगाव बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बैठक बोलवण्यात आली होती. त्यात समविचारी संघटनांचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. ॲड. उत्तम कदम यांनी अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात येऊन कांदा निर्यातबंदीविरोधात तीव्र लढा उभरण्यावर एकमत झाले.

राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी वेगवेगळे आंदोलन न करता संयुक्तपणे आंदोलन उभारले पाहिजे तसेच लोकसभा आणि विधानसभेवर शेतकरी प्रतिनिधी कसे जातील, याकडे लक्ष देण्याचा विचार अध्यक्ष कदम यांनी मांडला. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे-पाटील, प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन काकडे, छावा क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक गोरख संत, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चांदोरे, कुबेर जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी तुषार शिरसाठ, गजानन घोटेकर, कैलास कोकाटे, श्रावण नवले, रामदास भुजबळ, दिगंबर दौंडे, मच्छिंद्र जाधव, ऋषिकेश घोलप, जयेश जगताप, दीपक शिंदे, साहिल शेख, सुदाम देशमुख, राजू शिरसाठ, विलास दरगुडे, रवींद्र तळेकर, संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते

गोयल यांची भेट न झाल्यास…

कांदाप्रश्नी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घडू न दिल्यास २६ डिसेंबरनंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नाशिक येथील निवासस्थानी किंवा दिल्ली येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा या बैठकीत छावा क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक गोरख संत यांनी इशारा दिला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT