Onion Export  Pudhari File Photo
नाशिक

Nashik Onion Export Crisis 2026 | जेएनपीटी येथे दीडशेहून अधिक कांद्याचे कंटेनर अडकले

Nashik Onion Export Crisis 2026 | युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई मार्केट बंद : कांदा उत्पादकांवर आर्थिक आपत्ती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई येथील जवाहर नेहरू पोर्ट बंदरावर नाशिकसह महाराष्ट्रातील कांदा निर्यातदारांचा १५० हून अधिक कंटेनरमध्ये भरलेला कांदा निर्यातीअभावी अडकून पडला आहे. हा कांदा प्रामुख्याने दुबईमार्गे आखाती देशांत निर्यात केला जातो.

मात्र सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे दुबईचे मार्केट पूर्णपणे ठप्प झाले आहे. दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्यामुळे हजारो टन कांदा कंटेनरमध्ये अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

निर्यात कधी सुरू होणार, दुबई मार्केट कधी उघडणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. आधीच पडलेले बाजारभाव उत्पादन खर्चात वाढ, निर्यात धोरणातील अनिश्चितता आणि आता युद्धामुळे पूर्णपणे ठप्प झालेली निर्यात. कांदा हा नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा कणा आहे.

निर्यात थांबल्यामुळे देशांतर्गत बाजारावर अतिरिक्त ताण येऊन भाव कोसळण्याची शक्यता प्रबळ आहे. कंटेनरमध्ये दीर्घकाळ पडून राहिल्यास माल खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही केवळ व्यापाऱ्यांची अडचण नसून, थेट शेतकऱ्यांच्या घामाची आणि कष्टाची होळी आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ आर्थिक नाही, तर अस्तित्वाचा प्रश्न आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून प्रतिक्विटल १५०० रुपये कांदा अनुदान जाहीर करावे अन्यथा राज्यभर अभूतपूर्व आंदोलन उभारले जाईल.
- भारत दिघोळे (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT