Dengue outbreak risk | ‘अल निनो’मुळे आता ‘डेंग्यू’च्या डंखांचाही ताप वाढणार! File Photo
नाशिक

Nashik Dengue Case|"नाशिककरांनो सावधान, डेंग्यूचा विळखा वाढला! जुलैच्या अवघ्या 13 दिवसांत आढळले 13 नवे रुग्ण"

Nashik Dengue Case | नाशिकमध्ये पावसाळा सुरू होताच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. घरांच्या परिसरातील भंगार साहित्य, निकामी टायर्स, शोभेच्या झाडांच्या कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास झाल्याने नाशिककरांना डेंग्यूची लागण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये पावसाळा सुरू होताच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. घरांच्या परिसरातील भंगार साहित्य, निकामी टायर्स, शोभेच्या झाडांच्या कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास झाल्याने नाशिककरांना डेंग्यूची लागण झाली आहे. जुलैच्या गेल्या १३ दिवसांमध्ये डेंग्यूचे १३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यू रुग्ण संख्येचा आकडा ३६ वर पोहोचला आहे.

नाशिक शहरात दरवर्षी पावसाळा आला की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. एडिस इजिप्ती नावाचे मादी डास डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. या डासांचा प्रादुर्भाव स्वच्छ पाण्यात होतो.

पावसाळ्यात घरांच्या परिसरातील भंगार साहित्य, नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या झाडांच्या कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. यात या डासांची पैदास होते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचे नेहमीच दिसते. यंदाही नाशिककरांना डेंग्यूचा डंख लागला आहे.

जुलैच्या गेल्या १३ दिवसांतच डेंग्यूसदृश आजाराचे १४७ रुग्ण आढळले होते. प्रयोगशाळेतील रक्तनमुन्यांच्या तपासणीअंती १३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. याचाच अर्थ डेंग्यूचा दररोज एक नवा रुग्ण आढळत आहे.

खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या डेंग्यू रुग्णांची माहिती मनपा वैद्यकीय विभागाला कळविणे संबंधित रुग्णालयांवर बंधनकारक आहे. मात्र, अनेक खासगी रुग्णालये ही माहिती कळवित नाहीत. त्यामुळे डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा निश्चित आकडा समोर येऊ शकलेला नाही. महापालिकेकडे नोंद असलेल्या आकडेवारीपेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१३ दिवसांत १३ नवे रुग्ण | ३६ डेंग्यू रुग्णांचा आकडा

असा वाढला प्रादुर्भाव

जानेवारी २०२६ मध्ये डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते. त्यानंतर फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २, एप्रिल १, मे ३ तर जून महिन्यात डेंग्यूचे ८ रुग्ण आढळले होते. जुलैच्या १३ दिवसांत या आजाराचे १३ नवे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू रुग्णसंख्येचा आलेख वाढता असल्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.

चिकनगुनियाचीही लागण

डेंग्यूपाठोपाठ नाशिकला चिकनगुनियाची देखील लागण झाली आहे. आतापर्यंत ५८४ संशयीत रुग्णांपैकी चार जणांना चिकनगुनिया असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात फेब्रुवारी, मार्च, मे व जुलै महिन्यात प्रत्येकी एक चिकनगुनियाबाधित रुग्ण आढळून आला आहे. डेंग्यू, चिकनगुनियाचे सर्वच रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून, कुणाचाही बळी गेलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT