नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्नत नाशिक अभियान आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या 'मिशन ग्रीन मॉन्सून' ही लोकचळवळ व्हावी, यात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे यासाठी वृक्षलागवडीकरिता नागरिकांना मोफत रोपे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांना रीतसर अर्ज करून मोफत रोपे उपलब्ध करून घेता येणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली. उन्नत नाशिक अभियान आणि नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात दि. २८ जून ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'हरित कुंभहरित मान्सून' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री महाजन यांच्या हस्ते व महापौर हिमगौरी आहेर - आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सातपूर विभागातील फाशीचा डोंगर परिसरात वृक्षारोपणाने अभियानाचा आरंभकरण्यात आला.
मोहिमेंतर्गत यंदाच्या पावसाळ्यात नाशिक शहर परिसरात सुमारे एक लाख झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यात महापालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून रोपांची लागवड केली जाणार आहे.
त्याचबरोबर नागरिकांचा सहभागही या अभियान यशस्वीतेसाठी मोलाचा ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांना वृक्षलागवडीकरिता मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सहाही विभागीय कार्यालयांमध्ये रीतसर अर्ज केल्यानंतर ही रोपे नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
मोठ्या प्रमाणात समूह वृक्षारोपण करावयाचे असल्यास महापालिकेच्या उद्यान विभागाचे सहकार्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी संयुक्त पाहणी करून जागा निश्चित केली जाईल. रोपांसाठी पाणीपुरवठ्याकरिता उद्यान विभागातर्फे टँकरही उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती भदाणे यांनी दिली आहे.
ही रोपे मोफत उपलब्ध होणार
अभियानांतर्गत शहरात देशी प्रजातीच्या रोपांची लागवड केली जात आहे. त्यामुळे वड, पिंपळ, उंबर, करंज, शिवन, बेल, आवळा, हिरडा, बेहडा, चिंच, आंबा या देशी प्रजातीची रोपे महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
66 वृक्षलागवडीसाठी महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये मोफत रोपे उपलब्ध होणार आहेत. नागरिकांनी उन्नत नाशिक अभियानांतर्गत 'मिशन ग्रीन मान्सून' अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका