नाशिक महापालिकेने आयटीडीपी सोबत सामंजस्य करार केल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी दिली. Pudhari News Network
नाशिक

Nashik NMC News : वाहतूक आराखड्यासाठी आयटीडीपीसमवेत करार

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणेसाठी मनपाचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी वाहतूक कोंडी फोडण्यासह शहर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी महापालिकेने इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन ॲण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) सोबत सामंजस्य करार केल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी दिली. आयटीडीपी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तांत्रिक साहाय्य, क्षमतावृद्धी आणि धोरणात्मक पाठबळ पाच वर्षासाठी देणार आहे.

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. आगामी सिंहस्थकाळात वाहनतळांची समस्या, वाहतूक कोंडीचा जाच हा अधिकच भेडसावणार आहे. त्यामुळे शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करताना पार्किंग धोरणाची आखणीही महापालिकेने हाती घेतली आहे. शहर सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून आयटीडीपी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी महापालिका- आयटीडीपी यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

यावेळी आयुक्त खत्री म्हणाल्या की, नाशिकमध्ये रस्ते, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आवश्यक आहे. आयटीडीपीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप अस्वथी म्हणाले की, नाशिककरांचे जीवनमान सुधारणारा, प्रदूषण कमी करणारा दीर्घकालीन व सर्वसमावेशक आराखडा तयार करून नाशिक शहर आदर्श करू. यावेळी अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागूल उपस्थित होते.

आयटीडीपी तांत्रिक साहाय्य, क्षमतावृद्धी आणि धोरणात्मक पाठबळ पुरवून नाशिकमध्ये शाश्वत वाहतुकीला गती देईल. तसेच रस्त्यांचे रुंदीकरण, सार्वजनिक वाहतुकीची मजबुती आणि शहर नियोजनामध्ये सर्वसमावेशक वाहतूक तत्त्वांचा समावेश करणे हा करारामागील उद्देश आहे.

सामंजस्य करारामुळे शहरातील वाहतूक धोरणात दीर्घकालीन, सर्वसमावेशक आणि शाश्वत बदल घडेल. या बदलामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारून प्रदूषण कमी होईल आणि नाशिक भारतातल्या अन्य शहरांसाठी एक आदर्श ठरेल.
मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका

असा होणार फायदा

  • हेल्दी स्ट्रीट्स संकल्पना राबविणार

  • रस्त्यांचे डिझाइन व विस्तार

  • सार्वजनिक बससेवेत सुधारणा

  • पार्किंग व्यवस्थापन, ई- वाहतूक, एकात्मिक वाहतूक आराखडा

  • प्रगत वाहतूक धोरणांची आखणी

  • वाहतुकीसंदर्भात तांत्रिक क्षमतावृद्धी

  • जनजागृती, माहितीची देवाणघेवाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT