Hospital Pudhari
नाशिक

Nashik NMC Hospital Inspection | नाशिकमध्ये 631 खासगी रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी; एकाही ठिकाणी त्रुटी नाही, अहवालावरच प्रश्नचिन्ह!

Nashik NMC Hospital Inspection | एकाही ठिकाणी त्रुटी न आढळल्याने आश्चर्य

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बदलापूरातील स्त्रीबीज प्रकरणात नाशिक महापालिकेने परवाना दिलेल्या गोविंदनगर परिसरातील मालती आयव्हीएफ सेंटरचा सहभाग उघड झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील खासगी रुग्णालये, सोनोग्राफी-गर्भपात केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत २०६ खासगी रुग्णालये, २०० सोनोग्राफी केंद्र, तर २२५ गर्भपात केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.

मात्र, या सर्व ६३१ खासगी रुग्णालये, सोनोग्राफी-गर्भपात केंद्रांवर महापालिकेला एकाही ठिकाणी त्रुटी न आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई शुश्रूषागृह अधिनियम १९४९ सुधारित नियम २००६ नुसार महापालिका क्षेत्रात कार्यरत प्रत्येक रुग्णालय, नर्सिंग होम, शुश्रूषागृह यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करणे व दर तीन वर्षांनी नूतनीकरण करून घेणे क्रमप्राप्त आहे.

मात्र, अनेक रुग्णालयांची नोंदणी नसल्याचे तसेच परवाना नूतनीकरण केले नसल्याचे समोर येत आहे. त्यातच महात्मानगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत आढळलेले अवैध गर्भपात केंद्र आणि काही महिन्यांपूर्वी गोविंदनगर परिसरातील मालती आयव्हीएफ सेंटरविरोधात बदलापुरात स्त्रीबीज तस्करी प्रकरणात दाखल गुन्हाप्रकरणी महापालिकेने दिलेला नोंदणी परवाना चर्चेचा विषय बनला होता.

रुग्णालयाच्या दर्शनीय भागामध्ये रुग्ण हक्क सनद व उपचार दरपत्रक याची माहिती लावली जात नसल्याच्या तक्रारीही होत्या. त्यामुळे शहरातील सर्वच रुग्णालयांची वर्षातून दोनदा अर्थात सहामाही तपासणीचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे. शहरातील सर्वच खासगी रुग्णालये, दवाखाने, सोनोग्राफी केंद्र, गर्भपात केंद्रांची तपासणी सुरू केली आहे.

तपासणीवरच प्रश्नचिन्ह

महापालिकेच्या माध्यमातून शहरात ३० नागरी आरोग्य सेवा केंद्र चालवली जातात. खासगी रुग्णालयांच्या तपासणीची जबाबदारी या नागरी आरोग्य सेवा केंद्रांवर सोपवली आहे. या केंद्रांच्या पथकांमार्फत २०६ खासगी रुग्णालये, २०० सोनोग्राफी केंद्र, तर २२५ गर्भपात केंद्रांची तपासणी झाली. मात्र, एकाही ठिकाणी त्रुटी आढळली नसल्याचा अहवाल वैद्यकीय विभागाला सादर झाला आहे. त्यामुळे या तपासणीवरच आता संशय व्यक्त होत आहे.

शहरातील सर्व रुग्णालये, प्रसूतिगृहे, गर्भपात केंद्र, सोनोग्राफी केंद्रांची नागरी आरोग्य सेवा केंद्रांच्या वैद्यकीय पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात येतील.
- डॉ. प्रशांत शेटे, प्र. मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT