Nashik Potholes pudhari photo
नाशिक

Nashik Potholes | खड्डे बुजविण्यासाठी मनपा अ‍ॅक्शन मोडवर; मंत्री गिरीश महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री उतरले रस्त्यावर

Nashik Potholes | शहरामध्ये रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू आणि त्यानंतर नाशिककरांची झालेली ओरड यामुळे खडबडून जागे झालेले महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरामध्ये रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू आणि त्यानंतर नाशिककरांची झालेली ओरड यामुळे खडबडून जागे झालेले महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. दोन दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असून, रविवारी (दि. २) कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री स्वतः रस्त्यावर उतरले होते.

मंत्री महाजन यांनी खड्डेमय रस्त्यांची पाहणी करत, आठवड्याभरात शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील आणि आगामी ३ ते ४ महिन्यांत नाशिकमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते दिसणार असल्याचा दावाही या वेळी दिला. तर, रस्ते दुरुस्तीचे काम गतीने करण्याचे आदेश मनपा आयुक्त खत्री यांनी दिले.

शहरातील मखमलाबाद रोड, पंचवटी, सिडको, सातपूर आणि नाशिकरोड परिसरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, वाहनधारकांना पाठीच्या आजारांना आणि वाहनांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. माध्यमांनी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवल्यानंतर महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात होता.

आयुक्त मनीषा खत्री यांनी रविवारी शहरातील रस्त्यांच्या परिस्थितीची आणि सुरू असलेल्या दुरुस्ती कामांचा आढावा घेतला. पावसाची उघडीप मिळताच सर्व प्रभागांमध्ये पेव्हर ब्लॉक आणि कोल्ड मिक्सच्या साहाय्याने तातडीने खड्डे बुजवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कामाच्या गुणवत्तेत कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते दिसणार : मंत्री महाजन

कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः शहरात उतरून खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली. आगामी ३ ते ४ महिन्यांत नाशिकमधील रस्ते सिमेंट काँक्रीटचे पाहायला मिळतील, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली. शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, आतापर्यंत ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मखमलाबाद रस्ता पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्री महाजन म्हणाले की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. दरवर्षी डांबरी रस्त्यांवर वाहनांचा भार आणि पावसामुळे खड्डे पडतात. त्यामुळे या वर्षी सर्व मुख्य रस्त्यांचे 'व्हाइट टॉपिंग' करून सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील ३० ते ४० वर्षे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, गॅस लाईन आणि फायबर केबल यांसारख्या युटिलिटी लाईन्स जमिनीखाली दाबण्याचे काम सुरू असल्याने खुदाई करावी लागत आहे. त्यातच यंदा मुसळधार पाऊस झाल्यामुळे खड्डे पडले आहेत. मात्र, येत्या आठवड्याभरात शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील. या कामाचा वेग वाढवण्यासाठी सर्व अधिकारी, कंत्राटदार आणि केंद्रीय एजन्सींची तातडीची बैठक घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दीपाली बेळेच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन तब्बल ३९ दिवस कोमात राहिल्यानंतर प्राण गमावावे लागलेल्या दीपाली बेळे यांच्या कुटुंबियांची रविवारी (दि. २) कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांत्वनपर भेटीवेळी बेळे कुटुंबाला पाच लाख रुपयांची शासकीय आर्थिक मदत जाहीर केली. नाशिकमधील रस्त्याची दुरवस्था सुधारून आगामी ३० ते ४० वर्षे खड्डे पडणार नाहीत, अशा दर्जाचे रस्ते बनवण्याचा शब्दही त्यांनी तमाम नाशिककरांना दिला.

दीपाली बेळे यांची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात आदळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनी सलग ३९ दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिली. मात्र, दुर्दैवाने त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

रविवारी मृत बेळे यांचा दशक्रिया विधि होता. या अत्यंत दुःखाच्या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी बेळे कुटुंबीयांची भेट घेऊन बेळे यांचे पती दिलीप बेळे, त्यांच्या तीन मुली, जावई, नातवंडे यांचे सांत्वन केले. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत महापौर हिमगौरी आडके, नगरसेवक प्रवीण जाधवर, नगरसेविका रुपाली नन्नवरे, रंजना भानसी, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, मनीषा पवार आदी उपस्थित होते.

दोन दिवसांत बुजवले १८७ खड्डे

मंत्री महाजन यांनी शहर खड्डेमुक्त करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आला आहे. शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांत एकूण १८७ खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. यात शनिवारी ५२, रविवारी १३५ खड्ड्यांचा समावेश आहे. १३५ खड्ड्यांत नाशिक पूर्व भागातील ७२ मोठे तर, २० खानलेले ओहल बुजविले आहेत. मखमलाबाद रोडवरील सुधारणीकरण सुरू झाले आहे.

सध्या तरी थोडा त्रास सहन करावाच लागेल

गिरीश महाजन म्हणाले, कालपासून शहरात वेगाने खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, पावसामुळे कामात काही अडथळे येत आहेत. पुढील ३ ते ४ महिन्यांत ती पूर्ण होतील. पुढील ३० ते ४० वर्षे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.

नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT