नाशिक : सतीश डोंगरे
इच्छुकांची संख्या मोठी असली की, बंडखोरीची भिती अधिक असते. सध्या एका मोठ्या पक्षाबाबत अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. या पक्षात प्रत्येक प्रभागात किमान १५ ते २० इच्छुकांची संख्या असल्याने उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न इच्छुकांना सतावत आहे. सध्या इच्छुकांकडून 'वेट ॲण्ड वॉच' ची भूमिका घेतली जात असली तरी अनेकांनी 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. याच भीतीपोटी एका बड्या पक्षाने इच्छुकांना चक्क शपथ देत त्यांच्याकडून बंडखोरी करणार नसल्याचे वदवून घेतले आहे.
महायुती, महाविकास आघाडीबाबतचा निर्णय पुढील दोन ते तीन दिवसांत घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर उमेदवार निश्चितीची प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारी जरी निश्चित झाली नसली तरी इच्छुकांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. घरोघरी पत्रके वाटपाबरोबरच भेटीगाठींना वेग आला आहे. एका प्रभागात चार उमेदवार दिले जाणार असले तरी चारपेक्षा अधिक इच्छुक प्रचारासाठी उतरल्याने तिकीट वाटप करताना नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. बहुधा ही बाब इच्छुकदेखील जाणून आहे. उमेदवारी नक्की कोणाला मिळणार या विचाराने त्यांची धाकधूक वाढली आहे.
दरम्यान, याच भीतीपोटी इच्छुकांनी एकमेकांचीच समजूत काढण्यासाठी चक्क 'शपथ' देण्याची शक्कल लढवली आहे. त्याचे झाले असे की, नाशिकरोड परिसरातील प्रभाग २१ मधील एका मोठ्या पक्षाच्या सर्व इच्छुकांनी एकत्र येत बुधवारी (दि.२४) प्रचाराचा नारळ फोडला. त्यासाठी प्रभागातीलच एका मंदिरात सर्व इच्छुक जमले. देवाचे आशीर्वाद घेताना, देवाने आपल्यालाच पावावे, अशी मनमोन प्रार्थनाही केली. मात्र, चारपेक्षा अधिक इच्छुक बघून एकमेकांची धास्तीही वाढली. तिकीट आपल्यालाच मिळेल. प्रत्येक इच्छुकाला विश्वास असला तरी दुसऱ्याचे तिकीट कापल्यास तो आपले काम करणार नाही, अशी भीतीही त्यांना सतावत होती. अखेर यातील एका इच्छुकाने पुढाकार घेत सर्वांना शपथ देण्याची अनोखी शक्कल लढवली. 'देवाच्या दरबारात मी शपथ घेतो की, पक्ष ज्या चार इच्छुकांना तिकीट देईल, त्यांचे आम्ही इमानेइतबारे काम करणार. बंडखोरी अथवा गद्दारी करणार नाही' या शपथेनुसार सर्व इच्छुकांनी वागणार असल्याचे एकमेकांना आश्वस्त केले. मात्र, हे इच्छुक शपथेवर ठाम राहणार काय हे लवकरच समजेल.
इच्छुकांचा 'प्लॅन बी' तयार
सध्या एका मोठ्या पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी असून, तिकीट वाटप करताना पक्षातील बड्या नेत्यांचा कस लागणार आहे. त्यामुळे तिकिटासाठी सध्या इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे, जर पक्षाने तिकीट नाकारले तर कुठल्या पक्षात उडी घेता येईल हा 'प्लॅन बी'देखील तयार ठेवला आहे. इच्छुक सध्या इतर पक्षात चाचपणी करत असल्याने या पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.