Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation |"30 मेपर्यंत रस्ते दुरुस्ती पूर्ण करा, अन्यथा..."; रस्ते दुरुस्तीसाठी अल्टिमेटम

Nashik Municipal Corporation | आयुक्तांचा पाहणी : ड्रीम कॅसल चौक ते मखमलाबाद कामांना गती देण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

संविहस्थाच्या आगामी पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या विकासकामांना वेग देण्यात येत असून, पंचवटीतील प्रभाग क्रमांक ६ मधील ड्रीम कॅसल चौक ते मखमलाबाद या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या दुरुस्ती, रुंदीकरण व विविध युटिलिटी कामांची पाहणी आयुक्त मनीषा खत्री यांनी केली.

पावसाळ्यापूर्वी ३० मेपर्यंत रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटम आयुक्तांनी संबंधित ठेकेदारांना दिला आहे. तसेच रस्त्याच्या एका बाजूचे काम ३० जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यामुळे पावसाळ्यादरम्यान मुख्य कॅरेजवेच्या कामांना गती मिळणार आहे.

पाहणीदरम्यान ड्रीम कॅसल परिसरापासून पुढील संपूर्ण मार्गावर पायी फेरफटका मारत रस्त्याची स्थिती, खराब झालेले भाग, पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती आवश्यक असलेले पॅचेस तसेच सुरू असलेल्या युटिलिटी कामांची बारकाईने तपासणी करण्यात आली. या मार्गावर भूमिगत जलवाहिन्या, ड्रेनेज लाइन, विद्युतवाहिन्या, पर्जन्य जलनिस्सारण यंत्रणा तसेच इतर आवश्यक नागरी सुविधा कामे समांतरपणे सुरू असून, भविष्यातील रस्ते बांधकाम लक्षात घेऊन त्यांच्या समन्वयातून नियोजन करण्यात येत आहे.

हा मार्ग विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंदीचा प्रस्तावित असून, भविष्यातील वाढती वाहतूक, सिंहस्थ काळातील संभाव्य गर्दी आणि परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेता, हा मार्ग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर

आयुक्त मनीषा खत्री यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारांशी संवाद साधत प्री-मॉन्सून कालावधीत सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. रस्ते बांधकाम आणि युटिलिटी कामांमध्ये आवश्यक समन्वय साधण्यात आला असून, ठरवून दिलेल्या मुदतीनुसार कामे पूर्ण करण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यापूर्वी नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी रस्ते दुरुस्ती, युटिलिटी समन्वय आणि वाहतूक व्यवस्थापनाची सर्व कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. संबंधित ठेकेदार आणि विभागीय यंत्रणांशी सातत्याने समन्वय ठेवत नियोजित मुदतीत कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
- मनीषा खत्री, आयुक्त, महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT