नाशिक : संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादन घेण्यासाठी नाशिकमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा आहेत. औद्योगिक वातावरणही सकारात्मक आहे. मात्र, संरक्षण क्षेत्रात स्थानिक उद्योजक पुढे येत नाहीत, ही खंत आहे. योग्य तंत्रज्ञान व संधी ओळखल्यास नाशिकमधील उद्योगांना संरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल. यासाठी संरक्षण खाते देखील आवश्यक मदत करेल. निवृत्त झालेल्या संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, असे प्रतिपादन स्कुल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट, लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांनी केले.
सातपूर येथील निमा हाऊस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर निमा अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल, मिलिंद राजपूत, नितीन आव्हाड, वैभव नागसेठीया, श्रीकांत पाटील, सचिन कंकरेज आदी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल सरना म्हणाले, संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी आणि संशोधन विकासासाठी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या संधी ओळखायला हव्यात.
नाशिकमधील उद्योगांकडे क्षमता असून, संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या अनेक वस्तूंची आयात करावी लागते. त्यामुळे आत्मनिर्भर भारत हा उपक्रम राबवून अधिकाधिक कामे जिल्ह्यातील उद्योगांकडूनच कसे करता येतील, याबाबत विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमुद केले. प्रास्ताविक नहार यांनी केले. बैठकीस नानासाहेब देवरे, रवींद्र पुंडे, दिपाली चांडक, जयश्री कुलकर्णी, प्रशांत जोशी, मयूर तांबे, हेमंत राख, जयप्रकाश जोशी यांसह अनेक उद्योजक आणि संरक्षण अधिकारी कर्नल नीरज चौधरी, लेफ. कर्नल रजत शर्मा, प्रशांत पतंगे आदी उपस्थित होते.
तरुणांनी पुढे यावे
'एचएएल'सारख्या मोठ्या उद्योग संस्थांना आवश्यक असलेल्या लहान-मोठ्या घटकांचे उत्पादन नाशिकमधील उद्योगांनी का करू नये, असा सवाल लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांनी उपस्थित केला. नाशिकमधील तरुणांनी या क्षेत्रात स्टार्टअप्स सुरू करून देशसेवेत योगदान द्यावे, आम्ही तरुणांच्या प्रोत्साहनाला सहकार्य करू असेही त्यांनी स्पष्ट केले.